कारवाई दरम्यान आरोपींची पोलिसांशी झटापट; दोघे ताब्यात
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील देवळाली येथे गोवा बनावटीची दारू व बनावट दारूची झाकणे बाळगल्याप्रकरणी करमाळा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ४ लाख २३ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या गुन्ह्यातील पाच पैकी दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १० च्या सुमारास देवळाली येथील अमोल शिंदे याच्या राहत्या घरासमोर तसेच ऊसाच्या शेतात पोलिस पथक कारवाईसाठी गेले असताना संबंधित व्यक्तींनी तपासणीला विरोध करत पोलिसांशी झटापट व बलप्रयोग करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

तसेच दारूमध्ये हातभट्टीचे द्रव्य अथवा इतर रसायने मिसळून मानवी जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची माहिती असूनही बनावट विषारी दारू तयार करण्याच्या उद्देशाने आरोपींनी साठा बाळगला असल्याचीही पोलिसांनी सांगितले आहे.

या कारवाईमध्ये करमाळा पोलिसांनी ४ लाख रुपये किंमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (एमएच १२ केवाय ६६१६), २० हजार १६० रुपये किमतीचे रॉयल इम्पॅक्ट ग्रेन व्हिस्कीचे १२ बॉक्स तसेच ऑफिसर्स चॉईस ब्ल्यू, रॉयल स्टॅग सिग्रम आणि इम्पेरियल ब्ल्यू या ब्रँडच्या नावांची एकूण ५७० बनावट प्लास्टिकची बूचे (टोपणे) असा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी करमाळा पोलिसांनी अमोल सदाशिव शिंदे, विकी सतीश अंधारे, धनंजय सदाशिव शिंदे, रतन सदाशिव शिंदे आणि अनुसया अमोल शिंदे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, १३२, १८९(२), १९०, १९१(२), ३५१(२), ३५२ तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींपैकी अमोल सदाशिव शिंदे (वय ३०, रा. देवळाली) आणि विकी सतीश अंधारे (वय ३०, रा. करमाळा) या दोघांना करमाळा पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता करमाळा न्यायालयाने या दोघांना दि.५ सप्टेंबर पर्यंत (तीन दिवसांची) पोलीस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी वळसणे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

.

.

