गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये डीजे डॉल्बी आणि लेझर न वापरण्याच्या पोलीस उप अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या सूचना
करमाळा, प्रतिनिधी – सोलापूर ग्रामीणच्या करमाळा पोलीस ठाण्याच्या वतीने गतवर्षीच्या गणेशोत्सवात शिस्तबद्ध मिरवणुका आणि उत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या गणेश मंडळांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मंगळवार दि. ८ रोजी दुपारी १२ वाजता करमाळा पंचायत समितीच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी गतवर्षी केलेल्या आकर्षक आरास किंवा देखाव्यासाठी शहरातील सावंत गल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाला प्रथम, किल्ला विभागातील लोकमान्य टिळक तरुण मंडळाला द्वितीय तर खाटीक गल्ली येथील अहिल्यादेवी हिंदू खाटीक तरुण मंडळाला तृतीय पारितोषिक देण्यात आले. तसेच गतवर्षीच्या शिस्तबद्ध गणेशोत्सव मिरवणुकांसाठी फंड गल्ली येथील लोकमान्य टिळक मित्र मंडळाला प्रथम, श्री देवीचा माळ येथील राजे रावरंभा तरुण मंडळाला द्वितीय तर सुतार गल्ली येथील नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाला तृतीय पारितोषिक देण्यात आले. यासोबतच गेल्या ४२ वर्षांपासून शहरातील सर्व गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांवर फुलसौंदर चौकातील जामा मशीद वरून पुष्पवृष्टी करणाऱ्या जामा मशीद ट्रस्टचा विशेष सन्मान या सोहळ्यात करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस. आणि पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या हस्ते सर्व पुरस्कारार्थी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना मानाच्या ढाली आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस उप अधीक्षक अंजना कृष्णा यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमावलीनुसार गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईटचा वापर न करण्याच्या सूचना दिल्या. शहर व तालुक्यातील सर्व गणेश मंडळांना नोंदणी करून घेण्याचे आवाहन करत ग्रामीण भागात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्याचे आवाहनही त्यांनी केले. याशिवाय शहरात काही ठिकाणी धोकादायक ठरू शकणाऱ्या महावितरणच्या तारा ओढून घेण्याच्या सूचनाही महावितरणच्या अधिकाऱ्यांना पोलीस उप अधीक्षक अंजना कृष्णा यांनी यावेळी दिल्या.
पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी गणेशोत्सव आगमन आणि विसर्जन मिरवणुकांसह गणेशोत्सवा दरम्यान गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्सव मूर्तीच्या देखभालीसह आपापल्या मंडळांमध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आणि महावितरणचे अधिकृत कनेक्शन घेऊन व गणेश मंडपामध्ये जुगार किंवा व्यसने न करता सामाजिक सलोखा राखत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
यावेळी शहरासह ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवा दरम्यान प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा बोलून दाखवल्या. यावर प्रशासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. पोथरे गावचे पोलीस पाटील संदीप पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर किल्ला वेस येथील लोकमान्य टिळक तरुण मंडळाचे सागर गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
.
.
.