September 11, 2026
IMG-20260910-WA0095

करमाळा, प्रतिनिधी – अलीकडील काळात शेतीकामात बैलाचा वापर कमी झाल्याने तसेच सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता शेती कामासाठी तसेच दूध दुभत्यासाठी जनावरे पाळणे अशक्यप्राय होत असताना करमाळा शहरातील सावंत परिवाराकडून मात्र यावर्षीही विकतच्या जिवंत बैल जोड्या घेऊन श्रावणी बैलपोळा साजरा करण्यात आला.

पारंपारिक बैलपोळा सार्वजनिक स्वरूपात साजरा करणारी सावंत परिवाराची ही चौथी पिढी आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वी करमाळा शहरात स्व. अनंतराव आबा सावंत यांनी बैलपोळा हा सण सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याची प्रथा सुरू केली. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी स्वतःच्या शेतातील बैलांची खांदे मळणी करून बैल पोळ्या दिवशी त्यांना स्वच्छ आंघोळ घालून करमाळा शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढून आणि मिरवणुकीनंतर सावंत गल्ली येथील त्यांच्या निवासस्थानासमोर सर्व बैल जोड्यांचे पूजन करून आणि लग्न लावून त्यानंतर उपस्थितांना पुरणपोळीचा बेत, असे या सार्वजनिक बैलपोळ्याचे स्वरूप होते.

स्व. अनंतआबांनंतर त्यांचे सुपुत्र स्व. सुभाषआण्णा सावंत आणि बंधूंनी ही प्रथा पुढे चालवली. स्व. सुभाषआण्णांच्या पाठीमागे त्यांचे बंधू विठ्ठलआप्पा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जि.प. सदस्य ॲड. राहुल सावंत, नगरसेवक संजय सावंत आणि सुनील सावंत यांनीही या प्रथेला खंड पडू दिला नाही.

सध्या पै. किरण सावंत हे या प्रथेला पुढे चालवत असून संपूर्ण सावंत परिवारासह करमाळा शहर आणि परिसरातील व्यापारी, शेतकरी, करमाळा कृ. उ. बाजार समितीतील हमाल तोलार आदी सर्वसामान्य लोक सावंत परिवाराच्या या सार्वजनिक बैलपोळ्यात सहभागी झाले.

गुरुवार दि.१० रोजी दुपारी बारा वाजता शहरातून २१ बैलजोड्यांसह गोमातांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी पाच वाजता सावंत गल्ली येथे या बैलांचे पूजन पारंपारिक पद्धतीने लग्न लावल्यानंतर उपस्थित सर्वांनी पुरणपोळीच्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि या सोहळ्याची सांगता झाली.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!