September 11, 2026
IMG-20260910-WA0055

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील उजनी लाभक्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा अनियमित होत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे धरणग्रस्त शेतकऱ्यांना दिवसा नियमित आठ तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याबाबत उजनी लाभक्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उजनी लाभक्षेत्रातील गावांचा वीजपुरवठा सुरळीत होत नसून ‘लोडशेडिंग’च्या नावाखाली सातत्याने वीजखंडित केली जात आहे. दिवसभरात आठ तासांऐवजी केवळ दोन ते चार तास वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पिके वाढीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी केळीबागा सुकून चालल्या आहेत.

सध्या पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पिकांना उजनी जलाशयातून पाणी देण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही. मात्र, जलाशयात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असतानाही वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पिकांना पाणी देता येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

धरणग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होत असून शेतीपंपांसाठी आठ तासांचा नियमित वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीची पूर्तता न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर अहिल्यानगर–टेंभुर्णी महामार्गावर शांततेत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सोलापूर, करमाळा पोलीस ठाणे, महावितरण कार्यालय करमाळा व जेऊर तसेच संबंधित कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!