पीक नुकसानीची मदत स्वतंत्र निर्णयाने
करमाळा, प्रतिनिधी – खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये करमाळा तालुक्याचाही समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार करमाळ्यात Trigger-1 (प्रथम कळ) लागू झाल्याने दुष्काळग्रस्त तालुका म्हणून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत.

शासन निर्णयानुसार करमाळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती तसेच कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सवलत देण्यात येणार आहे. ७.५ हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषी पंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आले असून, त्यावरील क्षमतेच्या पंपांना या निर्णयातील सवलत लागू होणार आहे.

याशिवाय शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांचे निकष शिथिल करून अधिकाधिक कामे सुरू करणे, गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा, टंचाई जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे, तसेच शेतकरी व शेतमजुरांसाठी अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. जनावरांसाठी चारा, जलसंधारणाची कामे आणि पिण्याच्या तसेच पशुधनाच्या पाण्याचे नियोजन करण्याचेही निर्देश शासनाने दिले आहेत.

पीक नुकसानी बाबत मदतीसाठी स्वतंत्र निर्णय घेतला जाणार
दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीबाबतची आर्थिक मदत विहित कार्यपद्धती पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, Trigger-1 लागू झालेल्या सर्व तालुक्यांमध्ये पंचनाम्याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ सुरू करावी, तसेच सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे व GPS कोऑर्डिनेट संकलित करून अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

करमाळा तालुका Trigger-1 लागू झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी एक असून, शासनाच्या परिशिष्टात त्याचा स्पष्टपणे समावेश करण्यात आला आहे.

