October 28, 2026
IMG-20261008-WA0037

आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये कथित संघटित गुन्हेगारीचा ठपका; रामदास झोळ अद्याप फरार

सोलापूर – आर्थिक फसवणुकीच्या विविध प्रकरणांमुळे चर्चेत असलेला मनोहर भोसले उर्फ मामा, भाजपचे तथाकथित नेते तसेच दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ, त्यांच्या पत्नी आणि संस्थेच्या सचिवा माया झोळ यांच्यासह एकूण आठ जणांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली असून, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित आरोपींविरोधात आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये परस्पर संबंधित स्वरूपाची तसेच कथित समान कार्यपद्धतीने गुन्हे केल्याचा पोलिसांचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर प्रकरणांचा तपास करताना आरोपींच्या कथित संघटित कारवायांचा तपास करण्यात आला. त्यानंतर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.

दरम्यान, रामदास झोळ हे मागील काही दिवसांपासून फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. झोळ यांच्या पत्नी माया झोळ तसेच मनोहर मामा यांच्या कथित साथीदारांचाही या कारवाईत समावेश करण्यात आला आहे.

मोक्का कारवाईनंत या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक झाला असून, आरोपींची भूमिका, आर्थिक व्यवहार, फसवणुकीशी संबंधित पुरावे तसेच आरोपींमधील कथित परस्पर संबंध यांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

या प्रकरणातील आरोपांबाबत अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेत होणार असून, मोक्का कारवाई झालेल्या कोणत्याही आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवलेले नाही.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!