विहाळ ग्रामपंचायतीच्या तक्रारीची दखल; परिसरातील विहिरी व बोअरवेलचे पाणी दूषित होत असल्याचा सरपंचांचा आरोप
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील विहाळ येथील भैरवनाथ शुगर (युनिट-२) अर्थात शिवगिरी ॲग्रो वर्क्समधील पर्यावरणविषयक नियमांच्या कथित उल्लंघनाप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सोलापूर उपप्रादेशिक कार्यालयाने कारखान्याला नोटीस बजावली आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या (ईटीपी) टाकीतील गळती, चिमणीतून काळ्या धुराचे उत्सर्जन आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणेच्या देखभालीतील त्रुटी आढळल्याचे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. विहाळ ग्रामपंचायतीने केलेल्या तक्रारीची दखल घेत मंडळाने कारखान्याला सात दिवसांच्या आत खुलासा करून कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सोलापूर उपप्रादेशिक कार्यालयाने २६ डिसेंबर २०२५ रोजी ही नोटीस बजावली आहे. त्यापूर्वी २४ डिसेंबर २०२५ रोजी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्याची पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान काही त्रुटी निदर्शनास आल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

ईटीपी टाकीला गळती, चिमणीतून काळा धूर
कारखान्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या टाकीला गळती असून, त्यातून बाहेर पडणारे सांडपाणी आणि कंडेन्सेट खाली वाहत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. तसेच चिमणीतून मोठ्या प्रमाणात काळा धूर बाहेर पडत असल्याचे आणि इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर (ईएसपी) यंत्रणेतील एक घटक देखभालीसाठी बंद असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, कारखान्याने संमतीपत्रातील अटींनुसार बँक गॅरंटी सादर करणे किंवा तिची मुदतवाढ घेणे, कारखान्याच्या नावातील बदलासाठी संमतीपत्रात आवश्यक दुरुस्ती करून घेणे आणि विहाळ ग्रामपंचायतीने उपस्थित केलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
नोटीस प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत संबंधित त्रुटींबाबत खुलासा आणि त्यावर केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश कारखाना व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीत समाधानकारक खुलासा व कार्यवाही न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यासाठी प्रकरणाची शिफारस करण्यात येईल, असा इशाराही मंडळाने दिला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी निखिल एल. मोरे यांनी ही नोटीस बजावली असून, या कारवाईमुळे विहाळ परिसरातील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर -सरपंच पूजा मारकड यांचा आरोप
विहाळ येथील शिवगिरी ॲग्रो साखर कारखान्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा मोहन मारकड यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की “कारखान्याच्या प्रदूषणामुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेलचे पाणी दूषित झाले आहे. कारखाना सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर राख परिसरात पडते. ही राख नागरिकांच्या अन्न-पाण्यात जात असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रारी करत आहोत. आता मंडळाने आमच्या तक्रारीची दखल घेतली आहे. संबंधित कारखान्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.”

दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावलेल्या नोटिशीनंतर कारखाना व्यवस्थापनाकडून प्रदूषण नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र देशमुख यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

