उसाचा दर तातडीने जाहीर करण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांचे साखर आयुक्तांना निवेदन; केळी, ऊस व फळबागांचे सरसकट पंचनामे करण्यासाठी कृषिमंत्र्यांची घेतली भेट
करमाळा, प्रतिनिधी – राज्यातील साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील उसाचा दर तातडीने जाहीर करण्याबाबत करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांना निवेदन दिले आहे. यासोबतच या शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांचीही भेट घेत करमाळा तालुक्यातील ऊस, केळी सह इतर सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवार दि.९ रोजी पुणे येथील साखर आयुक्तालयात साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन राज्यातील साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामासाठी उसाचे दर तातडीने जाहीर करावेत, अशी मागणी करत निवेदन दिले. वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून ऊसाला योग्य दर द्यावा, तसेच ऊस बिलांची वेळेत अदायगी करावी, अशी अपेक्षाही या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आयुक्तांकडे यावेळी व्यक्त केली.
यासोबतच करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे केळी, ऊस आणि इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अद्याप या पिकांचे दुष्काळी पंचनामे करण्यात आले नसल्याने या शेतकऱ्यांनी शनीवारी राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांची इंदापूर येथे भेट घेतली. शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेत कृषिमंत्री भरणे यांनी करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत करमाळा तालुक्यातील केळी, ऊस तसेच सर्व फळबागांचे दुष्काळी पंचनामे सरसकट आणि तातडीने करण्याचे आदेश दिले.
दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर तसेच पिकांच्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी पंचनामे वेळेत होणे आवश्यक असल्याने कृषिमंत्र्यांनी दिलेल्या आदेशामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी शेतकरी अविनाश सरडे, महादेव पोरे, इनुस सय्यद, शंकर बोंद्रे, सचिन गावडे, योगेश सरडे, अशोक घोगरे यांच्यासह चिखलठाण आणि परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. केळी, ऊस आणि इतर फळबागांसह तालुक्यातील सर्वच भागात सरसकट पंचनामे सुरू आहेत. काही भागात अद्याप अधिकारी पोहोचले नसले तरी तालुक्यातील सर्व नुकसान ग्रस्त शेती क्षेत्राचे पंचनामे लवकरच होऊन जाणार आहेत. -शिल्पा ठोकडे, तहसीलदार, करमाळा.
.