October 27, 2026
IMG-20260429-WA0036

भोंदू बाबा मनोहर भोसले व विशाल वाघमारेविरुद्ध आणखी एक फसवणुकीचा गुन्हा

करमाळा, प्रतिनिधी – भोंदू बाबा मनोहर ऊर्फ मामा भोसले आणि त्याचा साथीदार विशाल ऊर्फ नाथबाबा वाघमारे यांच्याविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. मुलीच्या विवाहाबाबत भविष्य सांगणे, पत्नीला उपसरपंच करण्यासाठी पूजा करण्याचे आमिष दाखवणे आणि फ्लॅटच्या भाडे व अनामत रकमेच्या व्यवहारातून फिर्यादीची एकूण ८ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मांजरी येथील बांधकाम व्यावसायिक विशाल जयसिंग मस्के (वय ५०) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, मस्के हे आपल्या मुलीच्या विवाहाबाबत भविष्य जाणून घेण्यासाठी नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनोहर भोसले याच्याकडे गेले होते. त्यावेळी भोसले याने आपल्या मठातील काम पाहणाऱ्या विशाल वाघमारे याच्यामार्फत मस्के यांच्याकडून सुरुवातीला पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर मुलीचे लग्न होईल आणि पत्नी उपसरपंच होईल, असे सांगून प्रत्येक अमावस्येला उंदरगाव येथील मठात येण्यास सांगितल्याचा आरोप आहे.

त्यानुसार मस्के मठात गेले असता, आपण बाळूमामाचा अवतार असून आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून पत्नीला उपसरपंच करण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल, असे भोसले याने सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. या पूजेसाठी त्यांच्याकडून एक लाख रुपये घेतल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, मुलांच्या शिक्षणासाठी मांजरी परिसरातील साई बालाजी इमारतीत दोन फ्लॅट भाड्याने घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या दोन्ही फ्लॅटचे मासिक भाडे प्रत्येकी १२ हजार रुपये आणि अनामत रक्कम २० हजार रुपये ठरली होती. मात्र, एकूण ६३ महिन्यांचे भाडे आणि अनामत रक्कम देण्यात आली नसल्याचा आरोप आहे. पूजा आणि फ्लॅटच्या व्यवहारातून आपली एकूण ८ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे मस्के यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीवरून करमाळा पोलीसांनी मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा, २०१३ मधील कलम ३(१) व ३(३) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

मोक्काअंतर्गतही कारवाई

मनोहर ऊर्फ मामा भोसले आणि त्याचा साथीदार विशाल ऊर्फ नाथबाबा वाघमारे यांच्या टोळीविरुद्ध अलीकडेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. आता त्यांच्याविरुद्ध आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. आणि करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बालाजी वळसने करीत आहेत.

दरम्यान, अघोरी पूजा किंवा दैवी शक्तीच्या नावाखाली कोणी नागरिकांची फसवणूक करीत असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!