आदिनाथ संदर्भात कृती समिती सक्रिय; शेलगाव चौकात समन्वय समितीची बैठक संपन्न
करमाळा, विशाल परदेशी – सहकारी तत्त्वावर असलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना सभासदांना विचारात न घेता तसेच कामगार आणि वाहतूकदारांची देणी याबाबत कोणताही खुलासा न करता लिलाव प्रक्रियेद्वारे खाजगीकरणाच्या खाईत लोटला जात आहे, मात्र कायदेशीर प्रक्रियेद्वारे न्यायालयीन लढा उभा करून आदिनाथचे खाजगीकरण रोखणे शक्य असल्याचे शेतकरी कामगार संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. आदिनाथ वाचविण्यासाठी सरसावलेल्या कृती समितीच्या शेलगाव चौक येथील बैठकीत ते बोलत होते.
रविवार दि.११ ऑक्टो. रोजी दुपारी १२ वाजता शेलगाव चौका जवळील वर्धन पॅलेस येथे आदिनाथ बचाव कृती समितीच्या समन्वयकांची ही बैठक पार पडली. यावेळी पुढे बोलताना कांबळे यांनी सांगितले की, राज्यातील अनेक साखर कारखाने कर्जाच्या विळख्यात असले तरी सभासद शेतकऱ्यांनी तीन कारखाने बोत्रे पाटील यांच्या ताब्यात जाऊ दिलेले नाहीत. त्यामुळे आदिनाथ वाचवण्यासाठी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे जन आंदोलन पेटवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आदिनाथ बाबत सुरू असलेल्या प्रक्रियांबाबत तालुक्यातील प्रस्थापित गप्प असले तरी ज्याप्रमाणे उजनी वरील प्रस्तावित एआय प्रकल्पाला संयुक्त विरोधामुळे लोकांचा रोष पाहून प्रस्थापितांनी भूमिका बदलली, त्याचप्रमाणे आदिनाथच्या खाजगीकरणाबाबत संयुक्त विरोध केला उत्तर तालुक्यातील पुढारीही आपली भूमिका बदलतील, असे सुतोवाच कांबळे यांनी शेवटी केले.
यावेळी आदिनाथचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख यांनी प्रास्ताविकातून कृती समितीची रूपरेषा विशद केली तर जातेगावचे संतोष वारे, सांगवीचे गौतम मोरे, उजनी लाभक्षेत्रातील युवा नेतृत्व उदयसिंह देशमुख, शेलगाव येथील ज्येष्ठ संस्थापक सभासद त्रिंबक पोळ, वांगी नं.२ चे महादेव चौधरी, वांगी नं.३ चे शिवाजी तळेकर, आदिनाथचे कामगार प्रतिनिधी शिंगटे, ॲड . सविता शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास सातव, कामोणे येथील सचिन नलवडे आदींनी सभासदांना शेअर्स परतीच्या रकमेची अपेक्षा नसून आदिनाथचे खाजगीकरण न होता कामगारांसह तालुक्यातील वाहतूकदारांच्या हितासाठी आदिनाथ सहकारी तत्त्वावर चालण्यासाठी कृती समिती न्यायालयीन लढा लढण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. आदिनाथ सहकारी तत्त्वावर ठेवण्यासाठी तालुक्यातील सहाही जिल्हा परिषद गटांमध्ये जनजागृतीचा श्रीगणेशा संगोबा येथील श्री आदिनाथ महाराज मंदिरात उद्या सोमवार दि. १२ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात येणार असल्याचे कृती समितीने सांगितले असून यावेळी संगोबा आणि परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संतोष वारे यांनी केले आहे.
.