चार नवीन प्रकल्पांसह वीज प्रश्न, पाणी वाटप आणि मच्छीमारांच्या समस्यांवर होणार चर्चा
करमाळा, प्रतिनिधी : उजनी धरणावर प्रस्तावित चार महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे फायदे-तोटे, धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या, वीज प्रश्न आणि पाणी वाटपाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता जेऊर (ता. करमाळा) येथे ‘उजनी पाणी परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी ही माहिती दिली.

शासनाकडून उजनी धरण परिसरात सुमारे १.६५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून चार मोठे ग्रीन एनर्जी आणि हायटेक प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. यामध्ये तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, एआय डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आणि स्मॉल मॉड्युलर रिअॅक्टर यांचा समावेश आहे. या प्रकल्पांचा उजनी परिसरातील शेतकरी, धरणग्रस्त आणि पर्यावरणावर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन परिषदेत विविध घटकांची मते जाणून घेतली जाणार आहेत.

प्रस्तावित प्रकल्पांना विरोध करणाऱ्या आंदोलकांचे म्हणणेही यावेळी ऐकून घेतले जाणार असून, त्यानंतर आमदार नारायण आबा पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. याशिवाय उजनीच्या पाण्याचे वाटप, शेतीसाठी वीजपुरवठा आणि मच्छीमारांच्या विविध अडचणींवरही सविस्तर चर्चा होणार आहे.

या परिषदेत उजनी धरणग्रस्त संघटनेचे अविनाश सरडे, उपसभापती दत्तात्रय सरडे, उजनीच्या बॅकवॉटर परिसरातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि धरणग्रस्त शेतकरी सहभागी होऊन आपली मते मांडणार आहेत. सर्व संबंधित घटकांना आपली भूमिका मांडण्यासाठी हे व्यासपीठ खुले असल्याचे आयोजकांनी सांगितले.

आमदार नारायण आबा पाटील यांच्या सूचनेनुसार या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेला आमदार पाटील गटाचे आजी-माजी पदाधिकारी, धरणग्रस्त शेतकरी, पर्यावरणप्रेमी, पक्षीमित्र, मच्छीमार संघटना, उजनीसंबंधित धरणग्रस्त संघटना, करमाळा तालुका पत्रकार संघाचे प्रतिनिधी तसेच बॅकवॉटर परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले आहे.

.

