बारामती – बारामती तालुक्यातील कटफळ रेल्वे पुलाजवळ पालखी महामार्गावर रिअल इस्टेट व्यावसायिक राणा सूर्यवंशी यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून तसेच कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत इंदापूर तालुक्यातील जाचक वस्ती येथील रियल इस्टेट व्यवसायिक लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी यांनी बारामती पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, राणा दिलीप सूर्यवंशी हे बारामती परिसरात विक्रीसाठी असलेली जागा पाहण्यासाठी आले होते. त्यांना सदरची जागा दाखवण्यासाठी फिर्यादी लक्ष्मीकांत सूर्यवंशी हे सहकाऱ्यांसह कटफळ रेल्वे पुलाजवळ थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांपैकी मास्क घातलेल्या एका तरुणाने राणा सूर्यवंशी यांच्याजवळ येऊन आपण त्यांचा फॅन असल्याचे सांगत बुके देण्याच्या बहाण्याने जवळीक साधली.

त्यानंतर संबंधित तरुणाने पिस्तूल काढून राणा सूर्यवंशी यांच्या दिशेने गोळीबार केला. तसेच लोखंडी कोयत्याने त्यांच्या हातावर व पोटाच्या बाजूला वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यानंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना सोबत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने त्याचा पाठलाग केला. मात्र, झटापटीदरम्यान आरोपीने पोलिस कर्मचाऱ्याच्या हाताला चावा घेतला आणि शेताच्या दिशेने पळ काढला.

हल्ल्यानंतर जखमी राणा सूर्यवंशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

.

.

