October 27, 2026
IMG-20261021-WA0061

विरोधासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी – उजनी धरणासाठी जमिनींचा त्याग केल्यानंतर धरणग्रस्तांची तिसरी पिढी अद्याप पुनर्वसनापासून वंचित आहे. असे असताना ए आय प्रकल्पासह इतर विध्वंसक प्रकल्प उजनीवर येऊ घातले जात आहेत. या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी तालुक्यातील सर्वच गटांनी एकत्र येण्याचे आवाहन आमदार नारायणआबा पाटील यांनी केले आहे.

उजनी धरणाच्या निर्मितीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेकडो एकर सुपीक जमिनीचा त्याग मोठ्या मनाने केला आहे. यानंतर धरणासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांची तिसरी पिढी कर्ती झाली तरी अद्यापही पुनर्वसनाच्या सुविधांपासून हा भाग वंचितच आहे. त्यातही दरवर्षी येनकेन प्रकारे उजनीकाठच्या शेतकऱ्यांवर गरजेच्या वेळी पाणी वापरावर बंधने आणली जातात. या बंधनांबाबत उजनीकाठच्या शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू असतानाच सरकारने गुपचूप पणे येऊ घातलेल्या विध्वंसक प्रकल्पांना वाचा फुटली आहे. या जीवघेण्या प्रकल्पांबाबत इतर पुढारी अनभिज्ञ असले तरी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दि.२१ रोजी दुपारी एक वाजता जेऊर येथे उजनी पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेत बोलताना आमदार नारायण पाटील यांच्यासह नगोर्ली येथील सौरभ आरकीले, इंदापूर येथील ताटे सर, महेंद्र पाटील, चिकलठाण येथील अविनाश सरडे, गुलमरवाडी येथील नाना पवार, दादासाहेब पाटील, कोंढार चिंचोली येथील सुहास गलांडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्ता सरडे, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, नितीन राजेभोसले यांनी उजनी धरणावर होणारे ए आय, ग्रीन हायड्रोजन, सोलर पावर आणि अणुभट्टी या प्रकल्पांची दाहकता स्पष्ट करत त्यापासून होणारे विध्वंसक नुकसान आणि त्यासाठी एकत्रितपणे करावा लागणारा विरोध विशद करून या प्रकल्पांच्या विरोधासाठी शनीवार दि.३१ ऑक्टोबर रोजी भीमा नगर येथे होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांसह शेतकरी आणि मच्छीमार बांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

या बैठकीला जि.प. सदस्य भाऊसाहेब गोडसे, पंचायत समिती सदस्य व गटनेते अतुलभाऊ पाटील, पं.स. सदस्य ज्ञानेश्वर बिचीतकर, स्वप्नील काळे, धुळाभाऊ कोकरे, दत्तात्रय देशमुख, दत्तात्रय गव्हाणे, श्रीमंत चौधरी, विजयसिंह नवले, दादासाहेब पाटील, आबासो आंबारे, महादेव पोरे, रामेश्वर तळेकर, रविभाऊ कोकरे, बाबासाहेब बोरकर, श्रीहरी कदम, चंद्रप्रकाश दराडे, अमर ठोंबरे, विकास गलांडे यांच्यासह उजनी धरणग्रस्त भागातील अनेक शेतकरी आणि मच्छीमार बांधव उपस्थित होते. सुनील तळेकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!