October 27, 2026
IMG-20261024-WA0056

सखोल चौकशी करून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्याची नातेवाईकांची मागणी

करमाळा, प्रतिनिधी – पोस्को आणि आयटी ॲक्ट अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने स्वतःला दुखापत करून घेतल्यानंतर उपचारासाठी त्याला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान शुक्रवारी सदर कैद्याचा मृत्यू झाल्याची माहिती करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, करमाळा तालुक्यातील बिटरगाव (सांगवी) येथील कृष्णा ज्ञानदेव मोहिते (वय-३८ वर्षे) याच्यावर अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी दि.२०/१०/२६ रोजी गुन्हा दाखल होता. पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्याकडे या घटनेचा तपास होता. दि.२०/१०/२६ रोजी करमाळा पोलिसांनी कृष्णा मोहिते याला अटक केली होती. मात्र त्याला पोलीस कोठडीत टाकल्यानंतर त्याने कोठडीतील भिंतीवर डोके आपटून स्वतःला इजा करण्यास सुरुवात केल्याचे पो.नि. माने यांनी सांगितले आहे. यावेळी तो गंभीर जखमी झाल्याने करमाळा पोलिसांनी त्याला तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवार दि.२३ रोजी दुपारच्या वेळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी सुरू असल्याचे पो.नि. माने यांनी सांगितले आहे.

पोलीस कोठडीत असलेल्या संशयित आरोपीचा मृत्यू झाल्याने या घटनेबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. मोहिते याचा मृत्यू भिंतीवर डोके आपटल्याने झालेल्या दुखापतीमुळे झाला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत स्पष्टता येणे आवश्यक असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करावे, अशी मागणी मोहिते याच्या नातेवाईकांनी केली आहे.


.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!