निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता…!!!
करमाळा, प्रतिनिधी – सुट्टीच्या दिवशीही अर्ज दाखल करण्यास मुभा देण्यात आल्यानंतर करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी नगराध्यक्ष पदासाठी चौघा महिला उमेदवारांसह नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या तब्बल १०० उमेदवारांनी विविध प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे यांनी दिली आहे.

करमाळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. ही निवडणूक तिरंगी होणार असे गृहीत धरून शनिवार पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. सावंत यांच्या स्थानिक आघाडीसह भाजपा आणि शिवसेना (शिंदे पक्ष) यांच्यावतीने अर्ज दाखल केले जात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी रविवारी दाखल झालेल्या अर्जांसह एकूण सात महिला उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत. यामध्ये शिवसेनेच्या वतीने मा.आ. जयवंतराव जगताप यांच्या सुविद्य पत्नी सौ. महानंदा जयवंतराव जगताप आणि सौ. संगीता श्रेणिकशेठ खाटेर, भाजपाच्या वतीने सौ. जयश्री विलासराव घुमरे आणि सौ. सुनिता कन्हैयालाल देवी यांचे प्रत्येकी एक, सावंत यांच्या करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने सौ. मोहिनी संजय सावंत यांच्या नावाने दोन तर सौ. प्रियंका सिद्धांत वाघमारे यांचा एक असे एकूण सात अर्ज रविवार पर्यंत दाखल झालेले आहेत. याशिवाय नगरसेवक पदासाठी काहींचे एकाच प्रभागातून दोन तर काहींनी वेगवेगळ्या प्रभागातून मिळून एकूण १५५ अर्ज दाखल केले आहेत.

मा .आ. जगताप गटाकडून भरले गेलेले जवळजवळ सर्व अर्ज शिवसेनेचे गृहीत धरण्यात येत असून याच प्रकारे सावंत समर्थकांनीही सावंत यांच्या वतीनेच अर्ज दाखल केलेले आहेत. मात्र भाजपाच्या वतीने भरले गेलेल्या काही अर्जांना मा.आ. संजयमामा शिंदे म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची किनार असल्याचे बोलले जात आहे. भाजपाकडून घुमरे आणि देवी यांचे नगराध्यक्ष पदासाठी अर्ज असले तरी भाजपाकडून देवी यांना उमेदवारी न मिळाल्यास राष्ट्रवादीकडून स्वतंत्र लढणार असल्याची कुजबुज सुरू आहे.

सोमवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असून शिवसेना व भाजपाचे एबी फॉर्म कुणाच्या झोळीत पडणार याची उत्कंठा उमेदवारांसह मतदारांनाही लागलेली असून आतापर्यंत तिरंगी समजण्यात आलेली करमाळा नगरपालिकेची निवडणूक चौरंगी होते की काय, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

.

.

.

.

.
.
