करमाळा, विशाल परदेशी – करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेल्या भाजपा, शिवसेना आणि सावंत गटाच्या नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांच्या नावांबाबत कमालीची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र भाजपाकडून इच्छुक असलेल्या घुमरे आणि देवी या दोघांपैकी असलेल्या उमेदवारीबाबत सोमवारी दुपारपर्यंत सस्पेन्स राखला गेला.

रविवारी रात्री उशिरा भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची स्थानिक पातळीवर युती झाल्याचे तसेच नगराध्यक्षपदासाठी दोन पैकी एक नाव फिक्स झाल्याचे आणि नगरसेवक पदासाठीच्या जागांचे सुयोग्य वाटप झाल्याचे सांगितले गेले. मात्र सोमवारी दुपारपर्यंत सदर उमेदवारांची नावे जाहीर न झाल्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी च्या दोन्ही संभाव्य उमेदवारांना गृहीत धरून विरोधक गटांच्या हालचाली वाढलेल्या दिसल्या.

रविवारपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून मा.आ. जयवंतराव जगताप यांच्या पत्नी सौ. महानंदा जयवंतराव जगताप, भाजपाकडून सौ. जयश्री घुमरे तर सावंत गटाकडून सौ. मोहिनी सावंत यांच्या उमेदवार या जवळजवळ ठरलेल्या असल्याचे सांगितले जात होते. याशिवाय नगराध्यक्ष पदासाठी सोमवारी रासपाकडून सौ. भावना गांधी यांचा तर सौ. प्रियंका सिद्धांत वाघमारे यांचा अपक्ष म्हणून अर्ज आहे. मात्र रविवारी उशिरा भाजपाकडून शहरातील ठिकाणी फटाके वाजवण्यात आल्यानंतर देवी समर्थकांकडून सौ. देवी यांना तर घुमरे समर्थकांकडून सौ. घुमरे यांना भाजपाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाल्याचे सांगण्यात आले.

यानंतर विरोधक गटांकडून भाजपाच्या दोन्ही उमेदवारांची शक्यता लक्षात घेऊन आपापल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या दृष्टीने सावधगिरी चे पाऊल म्हणून काही घडामोडी केल्या. सोमवारी दुपारी एकच्या दरम्यान जगताप समर्थक सौ. संगीता श्रेणिकशेठ खाटेर, त्यानंतर सावंत गटाकडून सौ. चैताली सुनील सावंत यांचेही अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान दुपारी अडीच वाजल्यानंतर इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन दाखल करण्याच्या कार्यालयात तीन वाजण्यापूर्वी प्रवेश करण्याच्या सूचना देऊन बरोबर तीन वाजता या कार्यालयाचे गेट कुलूप बंद करण्यात आले. या कुलुपा सोबतच निवडणुकीच्या गट किंवा पक्ष यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह नगरसेवक पदांच्या उमेदवारांचे ए बी फॉर्मही कुलूप बंद झाले असून सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी उशिरा कोणत्या पक्षाकडून कोणत्या उमेदवारांना उमेदवारी मिळाली हे निश्चित सांगता येणार आहे.

.

.

.

.
