सुतार गल्लीतील परदेशी गट ठरला धुरंधर…
करमाळा, विशाल परदेशी – करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षीय उमेदवारांचा दणदणीत पराभव करत स्थानिक करमाळा शहर विकास आघाडीने नगरपालिका काबीज केली आहे. अत्यंत चुरशीच्या या लढाईत करमाळा शहर विकास आघाडीच्या सौ. मोहिनी संजय सावंत या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या असून करमाळा शहर विकास आघाडीचे तब्बल आठ उमेदवार निर्विवाद निवडून आलेले आहेत. गेली पाच टर्म नगरपालिकेवर वर्चस्व राखलेल्या शिवसेनेच्या जगताप गटाला या निवडणुकीत नगरसेवक पदाच्या केवळ पाच जागांवर समाधान मानत तिसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे. याशिवाय नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचा चंग बांधलेल्या भाजपाच्या बागल गटाला सात जागा मिळाल्या आहेत.

करमाळा नगरपालिकेच्या सत्तेत शहरातील स्थानिक जगताप, बागल, सावंत, देवी हे गट प्रामुख्याने सहभागी होत आले आहेत. करमाळा नगरपालिकेच्या अलीकडील काही निवडणुकांमध्ये पक्षीय शिरकाव होताना दिसत असला तरी २०२५ च्या निवडणुकीत भाजपात असलेल्या बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल आणि नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केलेल्या मा. आ. जयवंतराव जगताप यांच्यामुळे या निवडणुकीला पक्षीयरंग चढला होता. मात्र सावंत गटाने करमाळा शहर विकास आघाडीच्या बॅनर वर स्थानिक पातळीवर निवडणूक लढविण्याचे ठरवून नगराध्यक्ष पदासह सर्वच्या सर्व 20 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी तर झालीच मात्र स्थानिक आघाडीने पक्षीय गटांना धूळ चारल्याने सावंत गटाचा विजय विशेष चर्चिला गेला. भाजपाशी युती न झाल्याचे कारण पुढे करत राष्ट्रवादी अजित पवार गटानेही नगराध्यक्षपदाच्या भाजपा उमेदवार सौ. सुनीता देवी यांना पाठिंबा जाहीर करत राष्ट्रवादीच्या बॅनरखाली सात तर राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून एक असे आठ उमेदवार उभे केले असले तरी या निवडणुकीत या सर्वांचा सपशेल पराभव झालेला आहे.

नगरपालिका निवडणुकीत सुतार गल्ली येथील परदेशी गट ठरला धुरंधर
जगताप गट समर्थक म्हणून गणल्या गेलेल्या शहरातील विक्रमसिंह परदेशी यांना उमेदवारी डावलल्या गेल्यानंतर परदेशी गटाने बंडाचे निशाण हाती घेत सावंत गटात प्रवेश केला. आतापर्यंत जगताप गटाची शिस्त प्रमाण मानून जगताप समर्थक जगताप गटाचा निर्णय मान्य करत होते. मात्र जगताप यांनी उमेदवारी न दिल्याने परदेशी गटाने हा शिरस्ता मोडीत काढत धाडस केले आणि सावंत गटात प्रवेश केला. हेच धाडस सावंत गटाच्या विजयाची नांदी ठरला आणि परदेशी गटाने केलेल्या प्रवेशानंतर शहरातील अनेक छोट्या गटांनी सावंत गटाची पताका खांद्यावर घेतली. त्यामुळे परदेशी गट हा करमाळा शहर विकास आघाडीच्या दृष्टीने धुरंधर ठरला.

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्यांना पडलेली मते
१) मोहिनी संजय सावंत (करमाळा शहर विकास आघाडी) ६५२० मते
२) सुनिता कन्हैयालाल देवी (भाजपा) ४६८० मते
३) महानंदा जयवंतराव जगताप (शिवसेना) ४५५७ मते
४) भावना भद्रेश गांधी (रासप) १३१ मते
५) वाघमारे प्रियंका सिद्धांत (अपक्ष) ७० मते
प्रभाग निहाय विजयी उमेदवार आणि त्यांना पडलेली मते
प्रभाग – १
जबीन मुलाणी (करमाळा शहर विकास आघाडी) १०५७ मते
रवी जाधव (कशविआ) १०२५ मते
प्रभाग २
संजय सावंत (कशविआ) १४१६ मते
जोत्स्ना लुणीया (कशविआ) १२३० मते
प्रभाग ३
निर्मला गायकवाड (भाजपा) ८९५ मते
पुजा इंदलकर (कशविआ) ७०२ मते
प्रभाग ४
स्वाती फंड (भाजपा) १०१० मते
अतुल फंड (भाजपा) १२३१ मते
प्रभाग ५
साजीदा कुरेशी (शिवसेना) ४९३ मते
विक्रमसिंह परदेशी (कशविआ) ६७८ मते
प्रभाग ६
सुवर्णा आलाट (शिवसेना) ७०५ मते
प्रशांत ढाळे (शिवसेना) ९३४ मते
प्रभाग ७
अश्विनी अब्दुले (शिवसेना) ९१९ मते
युवराज चिवटे (शिवसेना) ७३५ मते
प्रभाग ८
सुनिता ढाणे (भाजपा) ८२५ मते
दिपक चव्हाण (भाजपा) ४९५ मते
प्रभाग ९
लता घोलप (भाजपा) ५४६ मते
सचिन घोलप (भाजपा) ५४६ मते
प्रभाग १०
संदिप कांबळे (कशविआ) ६१० मते
चैताली सावंत (कशविआ) ६४६ मते
निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे यांनी मतमोजणीची चोख व्यवस्था ठेवली होती. मतमोजणी दरम्यान आणि निकाला नंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा आणि पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

