चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बदलले नाव
करमाळा, विशाल परदेशी – नुकत्याच झालेल्या करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत “बदल हवा” म्हणून अपेक्षा व्यक्त केली गेली. या अपेक्षेप्रमाणे करमाळा नगरपालिकेवर नवोदित चेहरे निवडून आले आणि नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी आपापल्या प्रभागात बदलास सुरुवातही केली. मात्र नूतन नगराध्यक्ष आणि नगरसेवक आपापल्या भागात उत्साहात काम करत असतानाच करमाळा नगरपालिकेच्या इमारतीवर शनिवारी कराड नगरपालिकेचे नाव पाहून नागरिकांनी मात्र आश्चर्य व्यक्त केले. चौकशीअंती चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हा बदल केला गेला असल्याचे समजले.

करमाळा तालुक्याचे सुपुत्र दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाच्या माध्यमातून करमाळा तालुक्याचे नाव जगभरात पोहोचले आहे. सैराटच्या पूर्वी पिस्तुल्या आणि फॅन्ड्रीसारखे चित्रपट मंजुळे यांनी तालुक्यातील ग्रामीण भागात चित्रित केले होते. यानंतर सैराट चे चित्रीकरण करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात करमाळा शहरातही झाले होते. मागील काही दिवसांपूर्वी मंजुळे हे करमाळा नगरपालिकेच्या परिसरात येऊन गेले होते. त्यावेळीच करमाळा नगरपालिकेच्या परिसरात चित्रपटाची शूटिंग होणार असल्याचे अनेकांच्या लक्षात आले होते. आता प्रत्यक्ष चित्रीकरणासाठी नगरपालिकेच्या इमारतीच्या नामफलकासह या परिसरात होत असलेले बदल नागरिकांची उत्सुकता वाढवत आहेत.

या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष माहिती घेतली असता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कुस्तीपटू पै. खाशाबा जाधव यांच्या जीवन पटावर आधारित आणि नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखालील आगामी “खाशाबा” या चित्रपटाचे करमाळा नगरपालिकेसमोर उद्या (रविवारी) चित्रीकरण होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी दिग्गज कलाकार सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने या परिसरात पोलीस बंदोबस्तासह इतर नियोजन करण्यात आले आहे.

.

.

