सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव…
करमाळा, प्रतिनिधी – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या अंतिम निकालात तालुक्यातील उमरड येथील येथील सौ.पल्लवी गणेश मारकड-पाटील यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त (गट-अ (ACST- Class-1) पदावर निवड झाली आहे. सध्या त्या पुणे येथे GST विभागात राज्यकर अधिकारी (गट-ब) या पदावर कार्यरत आहेत.

सौ. पल्लवी यांची ही पहिलीच यशस्वी निवड नसून प्रशासकीय सेवेत काम करत असतानाच सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटीच्या जोरावर त्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. यापूर्वी २०२१ मध्ये त्यांची राज्यसेवा परीक्षेतून कामगार अधिकारी पदी व त्यानंतर २०२२ मध्ये गटविकास अधिकारी पदी निवड झाली होती. सौ. पल्लवी या पुणे येथे राज्यकर अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गणेश आनंदराव मारकड-पाटील यांच्या अर्धांगिनी असून त्यांच्या प्रत्येक यशामध्ये अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचे पती गणेश यांचे त्यांना मानसिक, शैक्षणिक व कौटुंबिक पाठबळ मिळत आले आहे.

सौ. पल्लवी यांच्या या निवडीमुळे उमरड परिसरासह करमाळा तालुक्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नवे आदर्श निर्माण झाले असून, त्यांची सातत्यपूर्ण यशस्वी वाटचाल आजच्या तरुण पिढीसाठी, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार, मार्गदर्शक व ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

.

.

.

