छत्रपती चौकात सर्वपक्षीयांकडून श्रद्धांजली
करमाळा, प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच करमाळा शहरातील दुकानदारांनी दैनंदिन व्यवहार थांबवून बुधवारी अघोषित बंद पाळला. यानंतर दुपारी बारा वाजता शहरातील छत्रपती चौकात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत अजित दादांना श्रद्धांजली वाहिली.

बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास राज्यातील वृत्तवाहिन्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त प्रसारित केले. या धक्कादायक बातमीची दखल घेत शहरातील दुकानदारांनी तात्काळ आपले सर्व व्यवहार थांबवून दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. अचानकपणे झालेल्या या अकल्पित घटनेनंतर करमाळा शहर व तालुक्याशी निगडित अजितदादांच्या आठवणी उजागर झाल्या.

दरम्यान दुपारी बारा वाजता करमाळा शहरातील युवकांनी छत्रपती चौकात एकत्र येत स्व. अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. बुधवारी दिवसभरात विद्यमान आमदार नारायण आबा पाटील, मा.आ. जयवंतराव जगताप, मा.आ. संजयमामा शिंदे, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल आदी नेतेमंडळींनी समाज माध्यमांवर शोकसंदेश देत स्व. अजित दादांना श्रद्धांजली वाहिली. निधनाच्या वृत्तानंतर शहरातील महाविद्यालये व शाळा सोडून देण्यात आल्या. शासकीय दुखवटा जाहीर झाल्यानंतर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दिवसभर शुकशुकाट दिसून आला.

अजितदादांच्या निधनानंतर करमाळा शहरासह तालुक्यातील केम, कंदर, जेऊर, सालसेसह तालुक्याच्या बहुतेक ग्रामीण भागातही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले. तालुक्याच्या ग्रामीण भागातही ठिकठिकाणी दुकाने बंद ठेवून स्व. अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

.

.
