March 1, 2026
IMG-20260209-WA0011

आज लागणार निकाल

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पंचायत समितीच्या बारा गणांच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. पक्षीय युती आणि स्थानिक आघाडी यांच्यात झालेल्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीमध्ये तालुक्यातील पक्षीय आणि स्थानिक गटांमध्ये झालेल्या युत्या आघाड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका विकास आघाडी स्वतंत्रपणे लढत असून विरोधात भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष युतीच्या माध्यमातून बागल आणि माजी आमदार शिंदे गट हे निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार काही ठिकाणी निवडणुकीत उतरले आहेत. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी भाजपा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करून निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे.

अनेक महत्त्वाच्या गटांमध्ये तालुक्यातील तीन स्थानिक गटांच्या विरोधात करमाळा तालुका विकास आघाडीची एकाकी झुंज दिसत असली तरी सर्वच उमेदवारांना विजयाची खात्री असल्याचे चित्र आहे.

आज दि.९ रोजी करमाळा तहसील आवारातील शासकीय धान्य गोदामात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण १८ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार असून १८ टेबलवर तीन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या या मतमोजणीत २ टेबलवर पोस्टल आणि १६ टेबलवर ईव्हीएम मतमोजणी होणार आहे. १ ते ८ क्रमांकाच्या टेबलवर पहिला गण व ९ ते १६ क्रमांकाच्या टेबलवर दुसरा गण याप्रमाणे एक गट व दोन गणांची मतमोजणी तीन फेऱ्यांमध्ये होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे यांनी दिली आहे.

आज जाहीर होणाऱ्या निकालाकडे करमाळा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजपाचे दिग्विजय बागल, विद्यमान आमदार नारायण पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर, माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे प्रवक्ते सुजित बागल, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संतोष वारे आदींसह त्या त्या गटातील आणि गणातील उमेदवारांना निवडून येण्याचा विश्वास बोलून दाखवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *