May 6, 2026
IMG-20260304-WA0061

विधवा माता-भगिनी, वारकऱ्यांच्या हस्ते शिवरायांचे पूजन

करमाळा, प्रतिनिधी – संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील जेऊर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा झाला. यावेळी मिरवणुकीत सहभागी विविध पारंपारिक वाद्यपथके या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले.

शनिवार दि.२८ रोजी सायंकाळी विधवा माता-भगिनी, वारकरी संप्रदाय आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून व पूजन करून जिजाऊ वंदनेने मिरवणुकीस प्रारंभ झाला. केवळ जल्लोष न करता शिवरायांसह सर्व महापुरुषांचे विचार घरोघरी पोहोचावेत या उद्देशाने मिरवणुकीदरम्यान सर्व महापुरुषांच्या विचारांवर आधारित १००० पुस्तकांचे वाटप करण्यात आले. मिरवणुकीच्या अग्रभागी १२ घोडे आणि ५ उंटांवर स्वार झालेल्या राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आणि माता रमाई यांची वेशभूषा केलेल्या छोट्या रणरागिनी आणि बालवीरांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर जेऊर, शेटफळ आणि कोर्टी येथील वारकरी मंडळींसह टाळ-मृदंग आणि विणेच्या गजरात मिरवणूकीत सहभागी झालेले बाल वारकरी, शेटफळ (ना) येथील लेझीम पथक, योद्धा करिअर ॲकॅडमीचे विद्यार्थी, पुणे येथील शंभो वाद्य व ढोल पथक, कोंढेज येथील भैरवनाथ लेझीम पथक, श्रीराम हलगी ग्रुप, बाभूळगावचे हलगी पथक, अंजनडोहचे गजे ढोल व ताशा पथक आणि महाराष्ट्र करीअर ॲकॅडमीच्या मुला-मुलींनी पारंपारिक वेशभूषेत आपली कला सादर केली. मिरवणुकीच्या शेवटी विद्युत रोषणाईने झळाळलेला आणि फुलांनी सजवलेला रथ आणि त्यावरील महाराजांची आकर्षक मूर्ती मिरवणुकीचे खास आकर्षण ठरली.

या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि जेऊर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणुकीनंतर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सर्व शिवप्रेमींसाठी शिवभोजनाची व्यवस्था करण्यात आली.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!