करमाळा प्रतिनिधी – शहरातील श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स येथे अमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे नुकसान, सोशल मीडियाच्या अतिरेकी वापराचे परिणाम तसेच रस्ते वाहतूक नियमांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी एपीआय गिरीजा मस्के, मंगेश पवार सर व इंगोले मॅडम प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक असून, कळत-नकळतपणे मुले चुकीच्या सवयींच्या आहारी कशी जाऊ शकतात, याबाबत त्यांनी विविध उदाहरणांसह माहिती दिली. योग्य वयातच विद्यार्थ्यांना योग्य-अयोग्य गोष्टींची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाईलचा अतिवापर आणि सोशल मीडियामध्ये वाढता सहभाग यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, मानसिकतेवर व दैनंदिन जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांचीही माहिती देण्यात आली. तसेच रस्त्यावर वाहन चालविताना व प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

शाळेच्या सर्वेसर्वा सुनीता देवी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार व सुजाण नागरिकत्वाची भावना विकसित करण्याचा तसेच त्यांचे भविष्य उज्ज्वल घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनपर व्याख्यान लक्षपूर्वक ऐकले. तसेच आपल्या मनातील विविध शंका व प्रश्न मान्यवरांना विचारले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना एपीआय गिरीजा मस्के यांनी समर्पक उत्तरे देत त्यांचे समाधान केले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर मॅडम यांनी आभार मानले.

.

.

