आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व मंत्री भरत गोगावले यांची भेट
करमाळा, प्रतिनिधी – करमाळा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांना गती मिळावी यासाठी आमदार नारायण आबा पाटील यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन महत्त्वाच्या विकासकामांसाठी निधीची मागणी केली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमदार पाटील यांनी करमाळा-बोरगाव-घारगाव (प्रजिमा-५) मार्गावरील सीना नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी १६ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी केली. सध्या संगोबा परिसरात नागरिकांना जलसंपदा विभागाच्या बंधाऱ्यावरून जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागते. या ठिकाणी पूल उभारण्यात आल्यास करमाळा तालुक्यातील सुमारे १२ गावांचा संपर्क तालुक्याच्या मुख्य भागाशी कायमस्वरूपी जोडला जाणार आहे.

मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान पुलाअभावी या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन संबंधित विभागाला पुलाचे काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याची आठवण आमदार पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना करून देत निधी मंजुरीची विनंती केली. त्यामुळे या पुलाच्या कामाला लवकरच गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यानंतर आमदार नारायण आबा पाटील यांनी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन करमाळा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांच्या विकासासाठी निधीची मागणी केली. यावेळी मंत्री गोगावले यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मातोश्री पाणंद रस्ता योजना ८५-१५) अंतर्गत करमाळा मतदारसंघातील सुमारे ५० किलोमीटर पाणंद रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

या दोन्ही बैठकींमुळे करमाळा मतदारसंघातील वाहतूक व ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

.

.

.

.

.

