करमाळा, प्रतिनिधी – भारतीय संस्कृतीत “माता हीच पहिली गुरु” या विचाराला साकार रूप देत दत्तकला इंटरनॅशनल स्कूलच्या CBSE व SSC विभागाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त मातृपूजनाचा संस्कारमय सोहळा उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी आपल्या मातांचे औक्षण करून त्यांच्या चरणी पुष्प अर्पण करत कृतज्ञता व्यक्त केली. या अनोख्या उपक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि भावनिक वातावरणाने भारावून गेला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली गीते, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व तसेच आईच्या संस्कारांचे मोल प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या सचिव सौ. माया रामदास झोळ यांचे पूजन त्यांचे सुपुत्र व संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पृथ्वीराज रामदास झोळ यांच्या हस्ते करण्यात आले. हा हृदयस्पर्शी प्रसंग उपस्थितांसाठी विशेष प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास मधुकर झोळ यांनी गुरुचे जीवनातील अनन्यसाधारण स्थान स्पष्ट केले. “दत्तकला शिक्षण संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच संस्कार, चारित्र्य आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. गुरु, माता-पिता आणि समाजाप्रती आदरभाव निर्माण करणे हीच खरी शिक्षणाची दिशा आहे,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन SSC विभागाच्या प्राचार्या सौ. सिंधू यादव आणि CBSE विभागाच्या प्राचार्या सौ. वृशाली बागुल यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी (CAO) डॉ. विशाल बाबर, विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गुरुपौर्णिमा व मातृपूजनाचा हा संस्कारमय सोहळा भक्तिभाव, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचा जागर घडवणारा ठरला.

.

.

.

.

.

.

