मुक्ता साळवे शैक्षणिक अभियानाचा उपक्रम; शिक्षणातून समाजविकासाचा संदेश
करमाळा : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुक्ता साळवे शैक्षणिक अभियान, करमाळा यांच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, पुस्तक व पेन देऊन गौरविण्यात आले.

यावेळी तेजस्विनी मंडलिक हिने सोलापूर विद्यापीठात इंग्रजी विषयात सुवर्णपदक मिळवल्याबद्दल, ॲड. मधुरा चांदणे, अमृता आरणे, प्रथमेश खंडाळे, संस्कार ढावरे, प्रियांका पवार तसेच संभव पवार यांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिष्माचार्य चांदणे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून गणेश भाऊ करे-पाटील उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक दादाराव लोंढे, माजी नायब तहसीलदार बाबासाहेब (दादा) गायकवाड, डॉ. ज्ञानदेव केमकर, श्रीकृष्ण अडसूळ, ॲड. सचिन लोंढे, नगरसेविका सुवर्णा आलाट यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

गणेश करे-पाटील यांनी “शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे प्रभावी साधन असून, शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास साधता येतो,” असे सांगितले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

माजी नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय ठेवून स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात भिष्माचार्य चांदणे यांनी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासोबत वक्तृत्व, संवादकौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्याचे आवाहन केले.

सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनी या सन्मानामुळे भविष्यातील वाटचालीस नवी प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर पवार सर यांनी केले, तर शिंदे सर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, समाजबांधव व शिक्षणप्रेमी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

.

.

.

.

