May 6, 2026
IMG-20260313-WA0081

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील केम, जातेगाव, पोथरे, कोर्टी आणि अर्जुननगर या गावांमधील रूपांतरित साठवण पाझर तलावाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी ‘पोतराज’ वेशभूषा धारण करून पारंपरिक ‘जागरण गोंधळ’ घालत सरकारचे लक्ष वेधून घेतले.

या आंदोलनाद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाने संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. यामध्ये मुख्य अभियंता नितीन दुसाने, अधीक्षक अभियंता चेतन कलशेट्टी, दक्षता गुण नियंत्रण पथकाचे सुहास गायकवाड आणि जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल शिरसागर यांच्यावर एसआयटी (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलकांच्या मते, संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष करून शासनाची फसवणूक केली आहे.

तलावाचे काम करणाऱ्या शिवनेरी कन्स्ट्रक्शनचे शिवाजी तळेकर यांनी प्रशासनाची दिशाभूल करून निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे तळेकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी आणि करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी केली.

शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी असलेल्या तलावांच्या कामात भ्रष्टाचार करणे हा गंभीर गुन्हा आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने जनतेचा पैसा लाटला जात आहे. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.
-अजित कुलकर्णी,
शहराध्यक्ष,
प्रहार जनशक्ती पक्ष, सोलापूर.

आझाद मैदानावर झालेल्या या आंदोलनात पारंपरिक वेशभूषा, बॅनरबाजी आणि घोषणांमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. या आंदोलनात अब्बास आली यादगीर, मुजाहिद सय्यद, प्रवीण चव्हाण, प्रताप तळेकर, सोमनाथ देवकर, मच्छिंद्र कोकाटे, रवींद्र मोरे, वैभव कोकाटे यांच्यासह करमाळा तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!