October 27, 2026
IMG-20261005-WA0033(1)

३० ते ३२ जणांविरुद्ध गुन्हा

करमाळा, विशाल परदेशी – तालुक्यातील पोटेगाव येथील सीना नदीवरील बंधारा दुरुस्तीच्या निकृष्ट कामावरून पोटेगाव, बाळेवाडी, पोथरे, निलज, बिटरगाव, बोरगाव परिसरातील महिला, पुरुष शेतकऱ्यांनी प्रशासन व ठेकेदारा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे बंधाऱ्याच्या कामाची गुणवत्ता तपासून, शेतकऱ्यांचे समाधान झाल्याशिवाय बिल काढले जाणार नाही, असे लेखी आश्वासन अधिकारी बाबा यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याने करमाळा पोलिसांनी ३० ते ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप करत बंधारा लाभक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यावेळी सुनील सावंत, संतोष वारे, दिग्विजय बागल, दशरथ कांबळे आदींनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार भारत थिटे यांना धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या तीव्र संतापाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी काम समाधानकारक होईपर्यंत ठेकेदाराचे बिल काढले जाणार नाही, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून महामार्गावर रास्ता रोको करून वाहतूक थांबविली व वाहनांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत ३० ते ३२ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये तसेच मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!