करमाळा-जेऊर रस्त्यावर पहाटेचा प्रकार
करमाळा, प्रतिनिधी – पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ७० वर्षीय आडत व्यापाऱ्याच्या हातातील सोन्याची अंगठी तीन अनोळखी व्यक्तींनी बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अशोक नेमचंद दोशी (वय ७०, रा. जय महाराष्ट्र चौक, करमाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.९ ऑगस्ट रोजी पहाटे ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी करमाळा जेऊर रस्त्यावरुन जात असताना सुमारे ५.१५ वाजता मौलालीचा माळ परिसरातील पाण्याच्या टाकी जवळील विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असताना तीन अनोळखी व्यक्ती अंधारातून त्यांच्या जवळ आल्या. या तिघांनी त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची अंगठी बळजबरीने हिसकावून घेतली. त्यानंतर तिघे जण मोटारसायकलवर बसून जेऊरच्या दिशेने निघून गेले. चोरून नेलेल्या अंगठीचे वजन अंदाजे ९ ग्रॅम असून तिची किंमत सुमारे ६३ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी तीन अनोळखी चोरट्यांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, स.पो.नि. गिरीजा मस्के या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

.

.

.

.

.

.

