July 28, 2026
IMG-20260707-WA0059

पत्रकार परिषद घेऊन तसेच सर्वसाधारण सभा घेऊन माहिती देण्याची मागणी

करमाळा, प्रतिनिधी – आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सुमारे ३३ हजार सभासद, शेतकरी आणि कामगार यांच्या मालकीचा असून कारखाना सहकारी तत्त्वावरच चालविण्यात यावा, अशी मागणी करत उदयसिंह देशमुख यांनी मंगळवार दि. ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी सांगितले आहे की, आदिनाथ कारखाना कोणत्याही परिस्थितीत भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय सभासदांच्या हिताचा नाही. कारखान्याच्या भवितव्याबाबत निर्णय घेताना संचालक मंडळाकडून सभासद, शेतकरी आणि ऊस उत्पादकांना विश्वासात घेणे आवश्यक असून हा विषय कारखान्याचे चेअरमन आ. नारायण पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन तसेच सर्वसाधारण सभेत मांडून सहकारी तत्त्वावर कारखाना चालविण्याचा ठराव करावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

तसेच कारखाना चालविणे शक्य नसल्यास शासनाने प्रशासक नेमून कारखाना सुरू करावा, मात्र तो खासगी व्यक्तींच्या ताब्यात देऊ नये, अशी भूमिकाही देशमुख यांनी मांडली आहे. कारखाना कराराने देण्याचा निर्णय झाल्यास मागील कामगारांची थकीत देणी कशी अदा केली जाणार, याबाबत संबंधितांनी लेखी हमी द्यावी, अशीही मागणी देशमुख यांनी यावेळी केली आहे.

उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आदिनाथचे सभासद, शेतकरी व सहकारप्रेमींनी मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी होऊन “आदिनाथ वाचवा, सहकार वाचवा” या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन उदयसिंह देशमुख यांनी शेवटी केले आहे.

दरम्यान उपोषण सुरू केल्यानंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सर्जेराव राऊत यांनी उपोषण स्थळी भेट देऊन कारखान्याबाबत अद्याप कोणताही विचार झाला नसल्याचे सांगून देशमुख यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी देशमुख यांच्या मागण्यांबाबत समाधानकारक लेखी खुलासा देणार असल्याचे राऊत यांनी सांगितले होते, मात्र मंगळवारी सायंकाळपर्यंत कारखाना प्रशासनाकडून कोणतेही लेखी उत्तर आले नसल्याने आपण उपोषणावर ठाम असल्याचे उदयसिंह देशमुख यांनी सांगितले आहे.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!