करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील पुनवर येथे मंगळवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याची उभारणी विना परवानगी झाल्याचे समोर येताच प्रशासनात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, करमाळा तालुक्यातील पुनवर येथील श्री दत्त मंदीरा शेजारील मुख्य चौकातील मयूर सावंत यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत राजा शिवछत्रपती मित्र मंडळाच्या मावळ्यांनी रात्रीतून गनिमी कावा करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. हा पुतळा खाजगी जागीच उभारलेला असून त्याची पूर्ण निघा राखण्याची जबाबदारी या तरुणांनी घेतली असून गावातील कोणाचाही या पुतळ्याला विरोध नसल्याचे पुतळा उभारणाऱ्या युवकांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान पुनवर गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची माहिती गावचे पोलीस पाटील बिभिषण नरसाळे यांनी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना दिल्यानंतर त्यांनी ताबडतोब पुतळा उभारल्याच्या ठिकाणी भेट देऊन विनापरवानगी पुतळा उभारल्याबद्दल तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पुतळा उभारण्यात आला असून प्रशासनाने कितीही कठोर कारवाई केली तरी हा पुतळा हटवणार नसल्याची भूमिका या तरुणांसह पुनवर गावकऱ्यांनी घेतली आहे. पुतळ्याचा ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महसूल प्रशासनाचे करमाळा मंडलाधिकारी राजकुमार पांडेकर, ग्राम महसूल अधिकारी निलेश मुरकुट यांनीही पुनवर गावात दाखल होत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना पुतळा उभारण्यात आल्याची माहिती दिली आहे. मंगळवारी सकाळी आठच्या दरम्यान राजा शिवछत्रपती मित्र मंडळाच्या वतीने पुतळ्यासमोर मंडप टाकून प्रतिष्ठापनेची तयारी सुरू असल्याचे दिसून आले पुतळा खाजगी जागेत असला तरी पुतळा उभारणी अगोदर प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे आवश्यक होते. महापुरुषांच्या पुतळ्याच्या अनुषंगाने भविष्यात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, याबाबत योग्य ती काळजी घेण्याबाबत तसेच पुतळ्याची योग्य ती निगा राखण्याबाबत संबंधितांना सूचनेचे पत्र देण्यात येणार आहे. -शिल्पा ठोकडे, तहसिलदार, करमाळा.
.