May 6, 2026
IMG-20260313-WA0101

महिलांनी कायद्याचे कवच धारण करण्याचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी) – स्त्री हा समाजाचा कणा आहे आणि हा कणा अधिक मजबूत करण्यासाठी तिला कायद्याचे बळ मिळणे आवश्यक आहे. केवळ कायदे असून चालणार नाही, तर त्यांचे ज्ञान तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. एम. घुगे यांनी केले. तालुका विधी सेवा समिती करमाळा, तालुका वकिल संघ करमाळा आणि यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे (शाखा-करमाळा) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी ‘यशकल्याणी सेवाभवन’ येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ‘कायदेविषयक जागरूकता शिबिरात’ ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गणेश कर-पाटील यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व साहित्यिक शैलीत केले. अज्ञान हे शोषणाचे मूळ आहे, म्हणूनच ‘ती’ला कायद्याचे शस्त्र बहाल करण्यासाठी या जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांसह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. पी. कुलकर्णी यांनी ‘कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायदा २००५’ आणि ‘हुंडा प्रतिबंधक कायदा’ याविषयी सखोल मार्गदर्शन केले. घरगुती छळाविरुद्ध दाद कशी मागावी तसेच स्त्रियांनी स्वतःच्या सन्मानासाठी कसे उभे राहावे, याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

प्रमुख वक्त्या ॲड. सविता शिंदे यांनी ‘बालविवाह प्रतिबंधक कायदा’ आणि ‘पोस्को (POCSO) कायदा’ याविषयी माहिती देताना बालकांच्या सुरक्षिततेसाठी कायद्यातील कडक तरतुदींची अंमलबजावणी किती महत्त्वाची आहे, हे उदाहरणांसह स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. एस. एम. घुगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जलसंवर्धन, जल पुनर्भरण आणि प्रदूषणमुक्त पाणी या सामाजिक विषयाला कायद्याच्या चौकटीतून मांडत, मागील दशकात महिलांसाठी लागू झालेल्या विविध कायद्यांची माहिती दिली. तसेच महिलांनी निर्भयपणे अन्यायाचा प्रतिकार करण्याचे आवाहन केले.

यावेळी व्यासपीठावर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. ए. एच. पठाण, ॲड. अमर शिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. एम. बी. चांदणे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ॲड. एस. एस. शिंदे यांनी मानले. या शिबिराला गिरधरदास देवी विद्यालय आणि नवभारत इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, माता-भगिनी, विधी सेवा समितीचे सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी यशकल्याणी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!