विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील देवळाली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत अस्वच्छ व दयनीय झाल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह वापरणे कठीण झाले आहे.

शाळेत शिक्षण घेणारी लहान मुले या अस्वच्छ परिस्थितीमुळे त्रस्त झाली असून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे. स्वच्छतेकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व पालकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला असून स्वच्छतागृहाची तातडीने साफसफाई व आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही पालक व ग्रामस्थांनी दिला आहे.

दरम्यान, या गंभीर समस्येकडे शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

.

.

.

