करमाळा, प्रतिनिधी – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करमाळा नगर परिषद आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ९ ते ११ मार्च या कालावधीत रंगलेल्या या महोत्सवात करमाळा शहरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाची सुरुवात सोमवार दि. ९ मार्च रोजी विकी मंगल कार्यालय येथे झाली. यावेळी संगीत खुर्ची आणि ‘बकेटमध्ये बॉल टाकणे’ या स्पर्धांचे उद्घाटन करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई सावंत, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती निर्मलाताई गायकवाड आणि सर्व नगरसेविकांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संगीत खुर्ची या मनोरंजनात्मक खेळात वर्षा गायकवाड या प्रथम, आम्रपाली कांबळे या द्वितीय आणि नलिनी जाधव या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. तर बकेटमध्ये बॉल टाकणे या स्पर्धेत शितल कोंगे यांनी प्रथम, सुनिता कणसे यांनी द्वितीय आणि आम्रपाली कांबळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

यानंतर मंगळवार दि. १० रोजी घेण्यात आलेल्या पाककृती स्पर्धेत कीर्ती पाचकवडे-दिरगुळे यांचा प्रथम, नलिनी जाधव यांचा द्वितीय आणि ललिता शिंदे व मनिषा जितेश कांबळे यांचा तृतीय (विभागून) क्रमांक आला. यानंतर घेण्यात आलेल्या उखाणे स्पर्धेत सुलभा मुळे प्रथम, सविता सुपेकर द्वितीय तर मनिषा बाभळे या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.

बुधवारी ११ मार्च रोजी या महोत्सवाचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रम आणि बक्षीस वितरणाने झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई सावंत होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. स्मिता बंडगर उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर निर्मलाताई गायकवाड, ज्योतीताई शहाणे, श्रद्धा तपसे, अंजली श्रीवास्तव, स्वाती माने यांसह नगर परिषदेच्या सर्व नगरसेविका आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांनी लोकगीत, एकपात्री नाटक, देवीची गाणी, ग्रुप डान्स, लावणी आणि रिमिक्स गाण्यांवर नृत्य सादर करून आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले.
याप्रसंगी सौ. प्रियंका गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर सौ. माधुरी परदेशी यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्याबद्दल माहिती दिली.

या कार्यक्रमास न. प. च्या आजी व माजी नगरसेविका स्वाती फंड, लता घोलप, अश्विनी अब्दुले, अर्चना आलाट, जबीन मुलाणी, जोत्स्ना लुणिया, चैताली सावंत, सुनिता ढाणे, पुजा इंदलकर, संगीता खाटेर, अश्विनी जाधव व अधिकारी शितल बहाड, सुप्रिया पालखे, बचत गटातील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अश्विनी जाधव यांनी केले. या यशस्वी आयोजनाबद्दल शहरातील महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

.

