April 13, 2026
IMG-20260118-WA0018(1)

करमाळा, प्रतिनिधी – समाज माध्यमांवर राज्यभर धुमाकूळ माजवत असलेल्या करमाळा तालुक्यातील वरकटणे येथील मेंढपाळांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणा संदर्भात करमाळा पोलिसांत बाल लैंगिक अत्याचारासह विनयभंग आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत दि. १२/०४/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत बारामती तालुक्यातील ३९ वर्षीय मेंढपाळ असलेल्या फिर्यादीने म्हटले आहे की, त्याच्यासह त्याचे नातेवाईक मेंढी पालनाचा व्यवसाय करत असल्याने त्यांचे नातेवाईक पुणे जिल्हा व जिल्ह्याबाहेर मेंढया चारण्यासाठी घेऊन जातात. शनीवार दि. ११/०४/२६ रोजी ते करमाळा तालुक्यातील सालसे येथे मुक्कामी होते. यानंतर रविवार दि.१२/०४/२६ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी त्याच्या सासूसह साडुची अल्पवयीन मुलगी व मुलगा, साडु, साडूचा चुलत भाऊ व इतर नातेवाईक मेंढया चारत चारत करमाळा तालुक्यातील सालसे गावातुन पुढे जेऊर गावाकडे जात होते. दरम्यान वरकटणे गावातील चौकाच्या पुढे निंभोरे रस्त्यावरून जात असताना तेथील एका अनोळखी माणसाच्या मोकळ्या शेतात त्यांच्या चार ते पाच मेंढया गेल्या.

त्यावेळी तेथे एका अनोळखीने येऊन ‘तुमच्या मेंढया माझ्या रानात का येऊ दिल्या’ असे म्हणुन साडुचा मुलाला हाताने मारहाण करु लागला. त्यावेळी आम्ही त्यास समजावुन सांगत होतो की, ‘आमच्या मेंढया आल्या असल्यातरी तुमचे रान हे मोकळे आहे. मेंढयाने काही खाल्ले नाही’, असे सांगत असताना ‘तुम्ही ईकडे कोणाला विचारुन आला’ असे म्हणुन त्यांने इतर गावातील लोंकाना फोन करुन बोलावुन घेतले.

त्यावेळी फिर्यादी व त्याच्यासोबतचे इतर लोक मेंढया घेऊन पुढे जात असताना तेथे ६ ते ७ अनोळखी लोक आले व त्यांनी या सर्वांना शिवीगाळ करुन काठीने व दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत फिर्यादीच्या सासूच्या उजव्या डोळ्यास दगड मारल्याने व काठीने डोकीत मारल्याने तसेच साडूच्या मुलाच्या डोक्यात, हातावर काठीने मारहाण केल्याने जखमी होवुन त्यांचे डोक्यातून रक्त येऊ लागले तसेच अल्पवयीन मुलीच्या हाताला धरुन ओढुन, तिला काठीने मारहाण करुन तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले आहे.

या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी अनोळखी सात जणांविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून करमाळा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *