आळजापुरच्या एकावर गुन्हा दाखल
करमाळा, प्रतिनिधी – आई-वडिलांना सांभाळण्याच्या मोबदल्यात शेतजमीन लिहून घेतलेल्या मुलाकडून वृद्ध आईला त्रास होत आहे. गेले वर्षभर मानसिक त्रास सहन केलेल्या या वृद्धेला आता मुलाने दमदाटी व मारहाण सुरू केल्याने तिने पोलिसात धाव घेतली आहे.

याबाबत कौसाबाई नाना काळे (वय-६५ वर्षे, रा. आळजापूर ता. करमाळा) यांनी दि.१५/०४/२६ रोजी करमाळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या दोन मुलांपैकी मच्छिंद्र नानासाहेब काळे याने फिर्यादीचे पती नाना काळे हे मयत होण्याच्या अगोदर फिर्यादी व त्यांचे पती यांना सांभाळण्याचे कबूल करून फिर्यादीच्या पतीकडून जमीन नावावर करून घेतली होती. मात्र काही दिवसांनी फिर्यादीचे पती मयत झाल्यानंतर मच्छिंद्र याने फिर्यादी कौसाबाई यांना घराच्या बाहेर काढले. मुलगा मच्छिंद्र याने फिर्यादी वयस्कर आहे, याची जाणीव असताना सुध्दा त्यांना जेवण न देता, औषधोपचारासाठी खर्च न देता कौसाबाई यांना उपाशीपोटी ठेवून शिवीगाळी, दमदाटी व लाथाबुक्यांनी मारहाण करुन घरातून हाकलुन दिले.

घरातून हाकलून दिल्यानंतर फिर्यादी कौसाबाई या मच्छिंद्र याच्या नावे असलेल्या शेतामध्ये छपराचे घर करून राहत होत्या. तदनंतर कौसाबाई यांना ग्रामपंचायतीकडून घरकुल मिळाल्याचे व छपराच्या जागी त्या घर बांधणार असल्याचे समजल्यानंतर दि. १४/०४/२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मच्छिंद्र हा फिर्यादी राहत असलेल्या छपराच्या घरासमोर आला व ‘तु माझ्या रानात घर बांधायचे नाही, तसेच तु इथे रहायचे नाही’ असे म्हणुन फिर्यादीला शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देत ढकलून दिले. त्यामुळे फिर्यादीच्या डाव्या गुडघ्याला मुक्का मार लागला.

कौसाबाई काळे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी त्यांचा मुलगा मच्छिंद्र नाना काळे याच्या विरुद्ध जेष्ठ नागरीक आणि पालक यांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियम २००७ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

