२३ वर्षांची उल्लेखनीय देशसेवा
करमाळा, प्रतिनिधी – केंद्रीय राखीव पोलीस दलातून (CRPF) मध्ये तब्बल २३ वर्षे देशसेवा बजावून श्रीदेवीचा माळ येथील सोमनाथ विलास डबडे हे सैन्यदलातून निवृत्त होऊन आपल्या मायभूमीत परत येत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय सेवापूर्ती निमित्त भव्य सत्कार व मिरवणूक समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमनाथ यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच सैन्य दलात सेवा करण्याची इच्छा बाळगून ते सीआरपीएफ मध्ये जवान म्हणून भरती झाले. ही सेवा बजावत असतानाच लहान बंधू बाळासाहेब विलास डबडे यांनाही देशसेवेसाठी प्रवृत्त केले आहे. बाळासाहेब हे सध्या बार्शी येथे पोलीस हवालदार म्हणून सेवा बजावत आहेत.

२३ वर्षांची उल्लेखनीय देशसेवा करत ते सीआरपीएफ हेड कॉन्स्टेबल म्हणून निवृत्त झाल्यानंतर सोमनाथ यांचे पिताश्री विलास गंगाधर डबडे, चुलते बाबुराव गंगाधर डबडे आणि डबडे परिवार तसेच श्री राजे रावरंभा तरुण मंडळ आणि श्री देवीचामाळ ग्रामस्थांच्या वतीने मिरवणूक आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सोमवार दि. २० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता करमाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक श्रीदेवीचा माळ येथील डबडे परिवाराच्या निवासस्थानासमोर आल्यानंतर शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सेवानिवृत्त सीआरपीएफ हेड कॉन्स्टेबल सोमनाथ डबडे यांचा सत्कार समारंभ होणार आहे.

या मिरवणुकीत आणि सत्कार समारंभात करमाळा शहर व तालुक्यातील देशप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

.

.

.

