उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित मेळाव्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
करमाळा, प्रतिनिधी – केंद्र सरकारच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याच्या धोरणा अंतर्गत करमाळा तालुक्यात स्थापन झालेल्या राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या विस्तारित युनिटस विविध शेतकरी उपयोगी सेवांचा शुक्रवार दि.२४ रोजी मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

जिल्हा कृषी अधिक्षक शुक्राचार्य भोसले, करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके, डी.डी.एम नितीन शेळके, वॉटरशेड ट्रस्टचे कांतीलाल गीते, जिल्हा परिषद सदस्य गणेश चिवटे, पंचायत समिती सभापती पूजा ढेरे, पंचायत समिती सदस्य भरत अवताडे, विवेक येवले, सुजित बागल, अजयकुमार बागल, डॉ.अमोल गोफणे, लता तिटके, शोभा आंधळकर, दिनेश पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला

यावेळी डीडीएम नितीन शेळके, तहसीलदार शिल्पा ठोकडे, पंचायत समिती सभापती पूजा ढेरे, पंचायत समिती सदस्य भरत अवताडे यांच्यासह आय सी एल, जय किसान, आर्या शक्ती या कंपनीच्या प्रतिनिधींनी शेती, माती, खते याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत कंपनीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा कृषी अधीक्षक भोसले यांनी सांगितले की, शासनाच्या कृषी विभागाच्या रोजगार हमी योजना, ठिबक अनुदान, फळबाग अनुदान योजना, अवजार बँक अनुदान योजना इत्यादी योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांसोबत आहेच. परंतु जिथे सरकार मदतीला मर्यादा पडतात, अशा ठिकाणी शेतकरी कंपन्या, एनजीओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकरी उत्पादक कंपनी ही व्यक्तिगत शेतीत सहकाराचे बदलते रूप आहे. येणारा काळ हा या कंपन्यांचा काळ असल्यामुळे शेतकऱ्यांनी कंपनीचे सभासद होणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

शासन अनुदान तसेच वॉटर, वॉलमार्ट यांच्या सहकार्याने मिळालेल्या निधीचा अतिशय योग्य उपयोग राजे रावरंभा कंपनीने केल्यामुळे आज कंपनी योग्य दिशेने वाटचाल करत आहे. स्वतःसह कंपनीचा विकास साधण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीचा अवलंब करावा.
-कांतीलाल गीते,
वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट.

कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अरुण चौगुले यांनी केले तर आभार प्रा. बिभीषण मस्कर यांनी मानले.

कंपनीच्या “या” शेतकरी सुविधा बेंद फाटा येथे सुरू झाल्या…
शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमात ॲग्रो मॉल, टिशू कल्चर केळी व डाळिंब रोपे, ठिबक, पीव्हीसी पाईप, रासायनिक खते व औषधे, जैविक निविष्ठा – निर्मिती, विक्री व मार्गदर्शन, विषमुक्त धान्य खरेदी विक्री, कोल्ड स्टोरेज, ६० टन क्षमतेचा वजन काटा, गांडूळ बेड युनिट, १० ड्रम युनिट, फवारणी ड्रोन, पावर टिलर, विडर, ग्रास कटर, एचटीपी पंप, वेदर स्टेशन, अंकुश पाटील तंत्रज्ञान औषधे या सुविधांचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ झाला.

