मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्र्यांना निवेदन; मागण्यांची दखल न घेतल्यास महावितरण कार्यालयासमोर जनआंदोलन छेडण्याचा इशारा
करमाळा, प्रतिनिधी – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवावा, तसेच अनधिकृत व अघोषित भारनियमन (लोडशेडिंग) तातडीने बंद करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री तथा राज्याचे ऊर्जामंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

दिवाळी हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी आणि व्यापारी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या सणाच्या काळात घरोघरी रोषणाई, लक्ष्मीपूजन तसेच विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, सणाच्या तोंडावरच महावितरणकडून करमाळा तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, अघोषित भारनियमन करणे आणि तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली तासनतास वीज बंद ठेवण्याचे प्रकार वाढल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणात नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागू नये, यासाठी सणाच्या संपूर्ण कालावधीत २४ तास अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवावा. कोणत्याही प्रकारचे भारनियमन करू नये, प्रत्येक वीज उपकेंद्रावर तातडीने बिघाड दुरुस्त करणारी आपत्कालीन पथके तैनात ठेवावीत, तसेच सणाच्या दिवसांत देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित करू नये, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

या मागण्यांची महावितरण प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. अन्यथा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी महावितरण कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.

या निवेदनाच्या प्रती महावितरणचे संचालक, मुख्य अभियंता बारामती, अधीक्षक अभियंता सोलापूर, कार्यकारी अभियंता बार्शी आणि उपकार्यकारी अभियंता जेऊर यांना माहितीस्तव पाठविण्यात आल्या आहेत.

निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अतुल निर्मळ, तालुकाध्यक्ष सुहास पोळ, नितीन खटके, आदिनाथ माने, हेमंत शिंदे, सोमनाथ जाधव, अजित उपाध्ये, सुहास शिंदे, उमेश मोहिते, वैभव मोहिते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
