May 6, 2026
झरे सबस्टेशन

महावितरणचे ‘चुटक्या’च्या पंपावर खापर तर पंपांसाठी पाणीच उपलब्ध नसल्याचा शेतकऱ्यांचा दावा

करमाळा, प्रतिनिधी – गेल्या चार दिवसांपासून कोणत्याच प्रकारच्या वीज पुरवठा होत नसल्याने झरे परिसरातील ग्रामस्थांनी रविवारी झरे सब स्टेशन वर एकत्र येत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विस्कळीत वीज पुरवठ्याबाबत जाब विचारला. यावेळी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुट्टी असल्याचे सांगत (उद्या) मंगळवारी ग्रामस्थांना चर्चेसाठी बोलवले आहे.

गतवर्षीही उन्हाळ्याच्या तोंडावर महावितरणाच्या झरे सब स्टेशनवर इतर ट्रांसफार्मर्स जोडल्यामुळे वीज पुरवठा विस्कळीत झाल्यानंतर झरे परिसरातील शेतकऱ्यांनी जळू लागलेल्या पिकांचा पुष्पगुच्छ अधिकाऱ्यांना भेट देत अनोखे आंदोलन केले होते. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी या सबस्टेशनवरील इतर अतिरिक्त ट्रांसफार्मर नियोजित सबस्टेशनला जोडल्यामुळे शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत होता. मात्र यावर्षीही पुन्हा इतर ठिकाणच्या ट्रांसफार्मर्सचा भार वाढल्यामुळे या शेतकऱ्यांची कृषी पंपांसह अधिकृतपणे असलेला घरगुती वीज पुरवठा ही बंद आहे. याबाबत ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. जेमतेम पाण्याच्या भरवशावर झरे परिसरातील काही शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासह थोडक्या ठिकाणी केळी किंवा ऊस पिकाची लागवड केली आहे. मात्र ऐन पाणी देण्याच्या दिवसात वीजपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे या शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह या पिकांना जगण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही.

त्यामुळे रविवारी सर्व बाधित शेतकरी झरे सब स्टेशन वर एकत्र आले. यावेळी सबस्टेशनच्या ऑपरेटरने वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिल्यामुळे महावितरणचे उपअभियंता आशिष कलावते आणि संबंधित अधिकारी झुंजकर यांनी सुट्टी असल्याचे सांगत मंगळवारी याबाबत सविस्तर चर्चा करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता संबंधित शेतकरी मंगळवारी करमाळा शहरातील महावितरण कार्यालयात एकत्र येऊन निवेदन देणार आहेत.

ग्रामस्थांच्या सोयीसाठी रात्री सिंगल फेज वीजपुरवठा सोडला असता काही शेतकरी चुटक्यावरील विज पंप चालवतात. त्यामुळे वाढलेल्या अतिरिक्त भारामुळे सदर सिंगल फेज लाईन ट्रीप होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रकारे चुटक्यावरील मोटारी वापरू नयेत.
-आशिष कलावते,
उप अभियंता, महावितरण करमाळा.

आमच्याकडील जलस्त्रोतांमध्ये पाणीच नसल्यामुळे चुटक्यावरील वीज पंप वापरण्याचा संबंधच येत नाही. काही थोडकी पिके असली तरी ती ठिबक सिंचन वर असल्याने थ्री फेज लाईन सुरू असताना या पिकांना पाणी देऊन होते. रात्री बेरात्री रहिवासी ठिकाणी सर्प आढळत असल्याने महावितरणने किमान सिंगल फेज वीजपुरवठा सुरळीत ठेवावा.
– शिवाजी घाडगे,
शेतकरी, झरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!