फरार टेम्पो चालकाचा शोध सुरू
करमाळा, प्रतिनिधी – दुचाकीला आयशर टेम्पोने ठोकरल्यामुळे दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तालुक्यातील भाळवणी येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मेन गेट समोर बुधवारी दुपारी हा अपघात घडला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, माढा तालुक्यातील भोगेवाडी येथील रोहिदास दिगंबर कवले (वय-४२ वर्षे) हे चुलते अभिमान मारुती कवले (वय-६० वर्षे) यांना दुचाकी क्र. एम एच ४५ डब्ल्यू ४३२५ वर घेऊन जेऊरच्या दिशेने निघाले होते. यावेळी दुपारी सव्वा एकच्या सुमारास हे दोघे भाळवणी येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मेन गेट समोर आले असताना पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोची त्यांच्या मोटारसायकलला धडक बसली. या धडकेमुळे दुचाकीवरील दोघेही जबर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच करमाळा पोलिसांसह माजी सैनिक ॲम्बुलन्स सर्विसचे साजिद शेख आणि विठाई ॲम्बुलन्स सर्विसचे रोहित लष्कर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी दोघांनाही करमाळा उपजिल्हा रुग्णालयात आणले असता अभिमान कवले यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले तर गंभीर जखमी झालेल्या रोहिदास कवले यांच्यावर उपचार सुरू केले. दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रोहिदास यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे नेणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी रोहिदास यांच्या नातेवाईकांनी त्यांना अकलूज येथील खाजगी रुग्णालयात नेले असल्याचे समजते आहे.

या अपघाताची नोंद करमाळा पोलिसात झाली असून करमाळा पोलिसांनी भाळवणी ते जेऊर दरम्यान असलेल्या सीसीटीव्ही फुटेज वरून आयशर टेम्पोचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला असून पोलीस नाईक आर. जे. मेहेर हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

