करमाळा, प्रतिनिधी – करमाळा-पुणे रस्त्यावरील रोशेवाडी गावाजवळील धोकादायक वळणावर मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास भरधाव वेगातील हायवा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार क्रश सॅंड घेऊन करमाळ्याकडून वीटच्या दिशेने जाणारा एमएच १३ डी क्यू ४३८८ क्रमांकाचा हायवा ट्रक वळणावर पुढे जाणाऱ्या पिकअप वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. या अपघातावेळी हायवा सुमारे २५ फूट फरफटत जाऊन उलटला. त्यामुळे रोशेवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात क्रश सॅंड विस्कटली. दरम्यान, या धोकादायक वळणावर पूर्वी तिहेरी गतिरोधक बसविण्यात आले होते. मात्र, या मार्गावर नियमित वाहतूक करणाऱ्या काही वाहन मालकांनी जेसीबीच्या साहाय्याने हे गतिरोधक हटविल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “गतिरोधक हटविल्यामुळे वाहनांचा वेग वाढून अपघातांचे प्रमाण वाढत आहे,” अशी प्रतिक्रिया रोशेवाडी येथील रहिवासी सतीश कांबळे यांनी दिली.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी संबंधितांवर कारवाई करून या ठिकाणी पुन्हा गतिरोधक बसविण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
.
.
.