May 28, 2026
IMG-20260521-WA0074(1)

दमदाटी करत पाच जणांच्या पाया पडण्यास भाग पाडले; कंदरच्या पाच जणांवर गुन्हे दाखल

करमाळा, प्रतिनिधी – मित्राला त्रास देत असल्याचे सांगत कंदर येथील दोघांनी एकाला पिस्टल आणि कोयत्याचा धाक दाखवत इतर तिघांना बोलावून मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ व अपमानास्पद वागणूक दिली आहे. याप्रकरणी दोघा मित्रांसह इतर तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत कंदर येथील आनंद अशोक खांडेकर (वय-३६ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१९/०५/२६ रोजी दुपारी ०३.१५ वाजण्याच्या सुमारास ते गावातील मराठी शाळेजवळ असताना स्वप्निल देवडकर व प्रदिप कदम या दोघांनी त्यांना स्विफ्ट कारमध्ये बसवले. यानंतर स्वप्निलने फिर्यादी खांडेकर यांच्या डोक्याला लोड केलेली पिस्टल लावून ‘प्रदिप कदमला का त्रास देतो’ असे म्हणत स्वप्निल व प्रदिप यांनी फिर्यादीला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर स्वप्नीलने फिर्यादी खांडेकर यांना जातीवाचक शिवीगाळ करत प्रदीपच्या पाया पडण्याचा आग्रह धरला. फिर्यादीने पाया पडण्यास नकार दिल्यानंतर स्वप्निलने त्याच्या भाच्यासह इतर दोघांना तेथे बोलवून फिर्यादी खांडेकर यांच्यावर कोयता उगारून प्रदीपच्या व गाडीत असणाऱ्या दोन लहान मुलांच्या पाया पडण्यास भाग पाडले. एवढ्यावरच न थांबता स्वप्नीलने फिर्यादी खांडेकर यांना गाडीमध्ये बसवून त्याच्या घरी नेऊन लहान मुलांना तोंडावर लघवी करण्यास सांगण्याची धमकी देत त्याच्या आई-वडिलांच्याही पाया पडण्यास भाग पाडले. यानंतर प्रदीपकडे वाकड्या नजरेने पाहील्यास गोळ्या घालण्याची तसेच पोलिसात ॲट्रॉसिटीची तक्रार दिली तरी माझे कोणी काहीच वाकडे करू शकणार नाही, अशी धमकी फिर्यादी खांडेकर यांना दिली.

खांडेकर यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी स्वप्निल देवडकर, प्रदिप कदम, स्वप्निलचा भाचा आणि दोन अनोळखी लोकांविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून करमाळा पोलिसांनी स्वप्निल देवडकर या आरोपीला ताब्यात घेऊन बार्शी न्यायालयात उभे केले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!