June 21, 2026
IMG-20260620-WA0044(1)

मानसिक स्थिती ढासळलेली निर्भया मदतीच्या प्रतिक्षेत

करमाळा, प्रतिनिधी – सोलापूर-अहील्यानगर महामार्गावरील जेऊर ते करमाळा दरम्यान असलेल्या कुंभेज फाटा ते खडकेवाडी फाटा या भागात एक मध्यमवर्गीय महिला गेल्या चार ते पाच दिवसांपासून भटकत असून महामार्गावरील भटकंती दरम्यान संभाव्य अपघातासह तिच्या अंगावर दिसून येणाऱ्या दागिन्यांसह तिच्या स्वतःच्या सुरक्षेचा आणि मानसिक संतुलन बिघडल्यामुळे तसेच तिचा एक हात व्याधीग्रस्त दिसून येत असल्याने तिच्यावर उपचाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

वरील नमूद भागातील एका गावाच्या जागृत महिला सरपंचाने याबाबत तेज वार्ता प्रतिनिधीला माहिती दिली आहे. या माहितीवरून या प्रकरणाचा तेज वार्ता प्रतिनिधीने शोध घेण्याचा प्रयत्न केला असता अहोरात्र भरधाव छोट्या-मोठ्या वाहनांची वर्दळ असलेल्या तसेच राजकीय अनास्थेमुळे सहा ऐवजी केवळ चारच पदरी राहीलेल्या महामार्गाच्या या तुकड्यात सदर महिला आढळून आली आहे. या महिलेबाबत चौकशी केली असता या भागातील छोट्या मोठ्या हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा चालक आणि पेट्रोल पंपावरील कामगारांनी सदर महिला गेल्या चार दिवसांपासून या मार्गावर भटकत असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. भटकून कंटाळल्यानंतर आणि भूक लागल्यानंतर सदर महिला ही या खाद्यपदार्थांच्या दुकानासमोर येऊन उभे राहून खाद्यपदार्थांकडे रोखून बघत असल्याने हे व्यावसायिक तिला उरलेसुरले अन्न देऊन टाकत असल्याचे या व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे.

या महिलेला मराठी भाषा अवगत नसली तरी हिंदी भाषा कळत असल्याचे तसेच कन्नड सदृश्य भाषेत ती बडबडत असल्याचे या व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी झरे फाटा येथील एका मंगल कार्यालयात सुरू असलेल्या लग्नकार्यात ही महिला खाद्यपदार्थांची मागणी करत असताना तेज वार्ता प्रतिनिधीला दिसून आली. यानंतर तेज वार्ता प्रतिनिधीने करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना याबाबत कल्पना दिली असून माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!