ग्रामीण भागातील विद्यार्थी क्रिकेट प्रशिक्षणासाठी दत्तक घेणाऱ्या लाड यांचा चिखलठाण येथे जाहीर सत्कार
करमाळा, प्रतिनिधी – मुलांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन भेटल्यास मुले नुसती घडतच नाहीत तर ते गावाचे, देशाचे, आई-वडिलांचे नाव उंचावतात, असे प्रतिपादन द्रोणाचार्य पुरस्कार व शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच भारतीय क्रिकेटला अनेक दर्जेदार खेळाडू देणारे नामांकित क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केले. तालुक्यातील चिखलठाण येथील सत्कार समारंभात ते बोलत होते.

दिनेश लाड यांचा चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूल येथे भव्य जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, प्रत्येकामध्ये गुणवत्ता असते. त्या गुणवत्तेला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य संधी मिळाली तर ते निश्चितच मोठे यश संपादन करू शकते, त्यामुळे मुलांमधील सुप्त गुण लक्षात घेऊन त्या गुणांना मूर्त स्वरूप देण्यासाठी पालकांनी प्रयत्न करणे गरजेचे असते. ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना संधी मिळाल्यास तेही देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दिनेश लाड यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सह अष्टपैलू क्रिकेटर शार्दुल ठाकूर तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटपटू सिद्धेश लाड यांसारखे अनेक नामवंत खेळाडू घडविले आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील चिमुकल्यांमधील क्रिकेट विषयक नैपुण्य लक्षात घेऊन अशा मुलांना क्रिकेट प्रशिक्षणासाठी ते दत्तक घेऊन प्रशिक्षण देतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना द्रोणाचार्य, तर महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे.

ईरा पब्लिक स्कूल व चिखलठाण ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात दिनेश लाड यांचा फेटा, पुष्पहार, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
गणेश करे पाटील, माजी सरपंच चंद्रकांत सरडे, जि.प. चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, पत्रकार आशिष राजपूत, पं.समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय सरडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्राचार्य ब्रजेश बारकुंड यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संकेत खाडे यांनी सूत्रसंचालन तर हराळे सरांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला चिखलठाण च्या सरपंच धनश्री गलांडे यांच्यासह दिनकर सरडे, किरण डोके, विरेन कुलकर्णी, नितीन तकीक, सुधीर पोळ, बालाजी पोळ, विनय सोपटे, विश्वजीत तारू, विलास झोळ, आनंद कसबे आणि चिखलठाण पंचक्रोशीतील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिनेश लाड यांनी स्वीकारली चिखलठाणच्या वनराज पोळच्या क्रिकेट प्रशिक्षणाची जबाबदारी
चिखलठाण येथील वनराज सुधीर पोळ या होतकरू क्रिकेटपटूची फलंदाजी व खेळातील गुणवत्ता पाहून द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याला प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वनराजला स्वतःकडे ठेवून त्याच्या क्रिकेट प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. मागील दोन वर्षांपासून ते त्याच्या गुणवत्तेला योग्य दिशा देत राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू म्हणून घडविण्याच्या प्रयत्नात आहेत. याशिवाय चिखलठाण सारख्या ग्रामीण भागातून होतकरू मुला मुलींसाठी विशेष शिबिर आयोजित करून गुणवंतांना प्रशिक्षणासाठी मुंबईला घेऊन जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

.

.

