विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमली करमाळा नगरी
करमाळा, प्रतिनिधी – श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स येथे आषाढी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आलेला बाल वारकऱ्यांचा भव्य दिंडी सोहळा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पारंपरिक वेशभूषा, विठ्ठलनामाचा गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि सांस्कृतिक सादरीकरणांमुळे संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता शाळेचे अध्यक्ष कन्हैयालालजी देवी, शाळेच्या सर्वेसर्वा सौ. सुनीता देवी, संचालक विजयकुमार दोशी, अजिंक्य गुगळे, श्री राजकुमार दोशी, गणेश करे पाटील, बाळासाहेब वांगडे व सौ. अंजली वांगडे यांच्या हस्ते पालखी पूजन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसह विविध संतांची वेशभूषा साकारली होती. मुलांच्या हातातील टाळ-मृदुंग आणि मुलींच्या डोक्यावर सजवलेले तुळशी वृंदावन यामुळे दिंडीला पारंपरिक वारकरी संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले. शहरातील विविध चौकांमध्ये विद्यार्थ्यांनी टाळनृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

इयत्ता यूकेजी, सहावी आणि दहावीच्या विद्यार्थिनींनी आकर्षक नृत्य सादर केले, तर पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक पाऊलकी सादर करून दिंडीची शोभा वाढवली. इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी “झाडे लावा, झाडे जगवा” अशा घोषणा देत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक महत्त्व आणि वारकरी संप्रदायाची परंपरा समजावून सांगितली.

बाल वारकऱ्यांच्या या दिंडीची सांगता दत्त मंदिर येथे झाली. यावेळी श्री प्रज्योत दोशी व सौ. आरती दोशी यांच्या हस्ते पालखीची आरती करण्यात आली. त्यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच स्नेहल कटारिया, मदनभाई देवी, मनुभाई गांधी, शहा, नागनाथ चिवटे, सिद्धू बदलानी आणि चुंग परिवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. भक्ती, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा भव्य बाल वारकरी दिंडी सोहळा करमाळेकरांसाठी विशेष आकर्षण ठरला.

.

.

.

.

.

