माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मागणीला ना. विखे पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील उजनी बॅकवॉटर परिसरातील शेतकऱ्यांना सलग ८ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा तसेच बहुप्रतिक्षित कुकडी–उजनी उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण तातडीने सुरू करावे, अशी मागणी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली. यावेळी तालुक्यातील शेती, सिंचन आणि पाणीटंचाईच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी उजनी बॅकवॉटर परिसरातील शेतकऱ्यांना अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मा.आ. शिंदे यांनी ना. विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी या परिसरात सलग ८ तास वीजपुरवठा सुरू करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.

याचबरोबर करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या कुकडी–उजनी उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण त्वरित सुरू करून पुढील प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचीही मागणी मा.आ. शिंदे यांनी केली. ही योजना पूर्ण झाल्यास तालुक्यातील सुमारे २४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून शेती उत्पादनात वाढ होण्यासह दुष्काळी परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात मात करता येणार असल्याचेही मा.आ. शिंदे यांनी सांगितले.

या मागण्यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक दखल घेत २५ जुलैपासून उजनी बॅकवॉटर परिसरातील वीजपुरवठा नियमित करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिल्याची माहिती मा.आ. शिंदे यांनी दिली आहे. तसेच कुकडी–उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणालाही तात्काळ सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदा मंत्र्यांनी दिल्याचे मा.आ. शिंदे यांनी सांगितले आहे.

.

.

.

.

.

.

