करमाळा, प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य गणेश चिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. या नियुक्तीमुळे करमाळा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर पश्चिम ग्रामीण भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नियुक्तीचे अधिकृत पत्र माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते गणेश चिवटे यांनी स्वीकारले. यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी तसेच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गणेश चिवटे यांचे अभिनंदन करताना सांगितले की, गणेश चिवटे हे भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्षांपासून निष्ठावान, अभ्यासू आणि संघटनप्रिय कार्यकर्ते आहेत. पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या असून संघटनात्मक कामात त्यांनी वेगळा ठसा उमटवला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मिळविलेल्या उल्लेखनीय विजयामुळे त्यांच्या नेतृत्वक्षमतेवर पक्षाने दाखविलेला विश्वास योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या संघटन कौशल्याचा पक्षविस्तारासाठी निश्चितच मोठा लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नियुक्तीनंतर भावना व्यक्त करताना गणेश चिवटे म्हणाले, “गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माझ्यावर सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि तितकीच जबाबदारीची बाब आहे. माझे मार्गदर्शक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारण्याचा योग लाभणे हे माझे भाग्य आहे.”

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करणार आहे. बूथ सक्षमीकरण, नव्या कार्यकर्त्यांची फळी उभी करणे आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणे याला प्राधान्य देत प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

गणेश चिवटे यांच्या नियुक्तीमुळे करमाळा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

.

.

