August 5, 2026
IMG-20260730-WA0059

करमाळा प्रतिनिधी : करमाळा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठे यश मिळवत २ लाख ५२ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा आणि ८ लाख रुपये किमतीची पजेरो स्पोर्ट कार असा एकूण १० लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी माढा तालुक्यातील गारअकोले येथील रोहित शिवाजी केचे (वय २४) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै २०२६ रोजी रात्री मौजे पांगरे (ता. करमाळा) हद्दीतील टेंभुर्णी–जेऊर मार्गावरील स्मशानभूमी जवळ गांजा विक्रीसाठी आणला जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर यांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या परवानगीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी सापळा रचला.

दरम्यान, संशयास्पदरीत्या उभी असलेली सिल्व्हर रंगाची पजेरो स्पोर्ट (क्र. MH-12-KF-9899) तपासणीसाठी थांबविण्यात आली. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या झडतीत कारमध्ये पाच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवलेला १० किलो १०० ग्रॅम गांजा आढळून आला. या गांजाची अंदाजे किंमत २ लाख ५२ हजार ५०० रुपये असून कारसह एकूण १० लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६४४/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर तसेच करमाळा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!