करमाळा, प्रतिनिधी – सैराट चित्रपटानंतर वडिलांच्या उपचारासाठी हॉस्पिटलच्याच मेडिकल दुकानातून औषधे घेण्याची सक्ती झाल्यानंतर नैराश्यातून केलेल्या व्हिडिओमुळे पुन्हा प्रकाश झोतात आलेल्या सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांच्या वडीलांचे सोलापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे.

अरबाजचे वडिल असलम रसूल शेख (वय६० वर्षे) यांना बुधवार दि.२९ जून रोजी हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना सुरुवातीला करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तेथील डॉक्टरांनी औषध व गोळ्या हॉस्पिटल मधील मेडिकल दुकानातूनच घेण्याची सक्ती केली होती.

अरबाज शेख हा मराठी सिनेकलाकार असला तरी त्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्याने नैराश्यातून समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल करून या हॉस्पिटलच्या अजब कारभाराची पोलखोल केली होती. या व्हिडिओमुळे वैद्यकीय क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातही खळबळ माजली होती.

या व्हिडिओची तातडीने दखल घेत शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख व उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार अरबाज शेख यांची भेट घेऊन त्यांना उपचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एक लाख रुपयांचा धनादेश उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत अरबाज शेख यांना दिला होता. यानंतर अरबाजच्या वडिलांना पुढील उपचारासाठी सोलापुरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडून अरबाज शेख यांच्या वडिलांच्या उपचारासाठी दीड लाख रुपयांचा निधी देण्यात आला.

मात्र दुर्दैवाने अरबाज शेख यांचे वडील असलम रसूल शेख यांचे गुरुवारी दुपारी सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी रात्री उशिरा करमाळा तालुक्यातील जेऊर येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये त्यांचा दफनविधी पार पडला. यावेळी राजकीय सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

.

.

.

.

.

.

